कोकणच गणपती


कोकणच गणपती
कोकणच गणपती
कोकणच गणपती
कोकणच गणपती
कोकणच गणपती
कोकणच गणपती

Information

गणेशोत्सव कोकणात जितका उत्साहाने साजरा केला जातो, तेवढा देशाच्या इतर कुठल्या भागात होत नसेल. याचे कारण गणेशोत्सव म्हटला की, कोकणातील कुणीही कुठेही व्यवसाय, नोकरीनिमित्त जगभरात असला तरीही तो या उत्सवासाठी घराकडे आल्याशिवाय राहात नाही. या उत्सव काळातले वातावरण भारलेले असते. या उत्सवाच्या निमित्तानेच कोकणी माणसांच्या मनाची श्रीमंतीही दिसते आणि उपजत असलेल्या अमाप उत्सवी स्वभावाचेही दर्शन होते.
जून महिन्यात कोकणात बरसणा-या पावसाबरोबर येणा-या सणांचीही चाहूल लागते. गुढीपाडव्यानंतर मराठी मुलखात सण येत नाहीत. ख-या अर्थाने श्रावण महिन्यापासूनच सणांचे दिवस सुरू होतात. कोकणात कोसळणा-या पावसाबरोबर निर्माण होणारे निसर्गसौंदर्य, चोहोबाजूला मनमोहक असणारे हिरवेगार वातावरण यामुळे सणांचाही आनंद द्विगुणीत करतो. नागपंचमी, श्रीकृष्णजन्माष्टमी आणि त्यानंतर येतो तो गणेशोत्सव. कोकण आणि सण-उत्सव असे एक वेगळे नाते कोकणचे आहे. श्रीगणेशाच्या आगमनाची चाहुल लागली की कोकणातील घराघरात उत्साही वातावरण असते. शहरी भागांमध्ये गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांमार्फत उत्साहात साजरा होतो. परंतु ग्रामीण भागातील गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाच्या घराघरात गणरायांचे आगमन होते. गणेशाच्या आगमनामुळे निर्माण होणारा सर्वाचा उत्साह सारखाच असतो. ग्रामीण भागात गणेशोत्सवाची तयारी ख-या अर्थाने नागपंचमीपासून सुरू होते. नागोबाचे पूजन झाले की गणपतीच्या चित्रशाळेत गणेशमूर्ती बसवण्यासाठी पाट दिला जातो. त्या पाटावर गणेशमूर्ती तयार केली जाते.

एकीकडे गणेशमूर्ती ‘शाळेत’ आकार घेत असताना प्रत्येक वाडीतील भजनीमंडळीही टाळ, मृदंग, तबला, पेटी, पखवाज हा सर्व साज जागच्या जागी आहेत की, नाही हे पाहतानाच भजनांच्या तालमींनाही जोर आलेला असतो. श्रीकृष्ण जन्माष्टमींचा ज्या घरी मांड असतो, त्या घरी पहिलं भजन केलं जातं आणि मग मंदिरात किंवा वाडीतील प्रमुखाच्या घरी दररोज या भजनाचा नाद घुमत असतो. अशाच या भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा आदला दिवसही येतो. यालाच ‘आवारणे’ म्हणतात. आवारणे म्हणजे गणेशाच्या आगमनापूर्वी घर आणि परिसर स्वच्छ करणे. यामध्ये भिंती गिलावाने व जमीन पूर्वी शेणाने सारवल्या जायच्या. आता ऑइलपेंटचा काळ आहे. परंतु घरावर रंगरंगोटीही अशीच असते. त्या गिलावाच्या रंगरंगोटीतही वेगळीच कलाकृती दडलेली असते. आदल्या दिवशी मूर्ती घरी आणून ठेवली जाते. त्याचवेळी श्रीगणेश आसनस्थ होणा-या जागी मागील भिंतीवर सुंदर वेलबुटी रेखाटलेली असते. ही तीही गावातील कुणी शेजारी ज्याला ब्रश नीट हाताळता येतो, असाच गावातील चित्रकार रेखाटत असतो. गाववाल्यांनाही गणपतीच्या पाठीमागे चित्र कुणाचे अधिक चांगले झाले याचे एवढे अप्रुप असते की, त्याची चर्चा अशीच एखाद्याच्या घराच्या ओटयावर बसून गुळपिठाच्या करंजीसोबत रंगत असते. श्रीगणेशमूर्तीच्या वरती मंडपी सजवण्याचाही एक वेगळाच आनंद असतो. शेरवाडा, कवडांळा आदी रानात मिळणाऱ्या या फळांनी हे मंडप सजवलेले असतात. गणेशचतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश मूर्ती आसनस्थ होते. त्याची पुरोहिताकडून पूजा केली जाते. त्यानंतर त्या त्या वाडीतील सर्व जण एकत्र येऊन गणपतीच्या आरत्या म्हणतात. रात्रीच्या वेळी भजन असते आणि हा भजनांचा जागर गणपती विसर्जनापर्यंत सुरू असतो. गावोगावी एक वेगळेच वातावरण तयार होते. शेती आणि डोंगर हिरवेगार झालेले असतात. शहरांमध्ये घरांना सौंदर्य आणावे लागते.
गावातली घरे ही निसर्गसौंदर्याच्या सहवासातच असतात. भातशेती आणि माळरानाचा हिरवागार शालू पांघरलेल्या स्थितीत गावात येणा-यासाठी जणू पायघडया अंथरल्याचा क्षणभर भास होईल, एवढे चांगले वातावरण असते. विघ्नहर्त्यां श्रीगणेशाच्या आगमनाने कोकणातील सारे वातावरण भारलेले असते. पूर्वी एस.टी.च्या गाडयांतून येणा-या चाकरमान्यांची गाडी आज त्याच्या घरापर्यंत, दारापर्यंत जात आहे. चाकरमान्याच्या मनिऑर्डरवर अवलंबून असणारा कोकणचा हा मुलुख आज आर्थिकदृष्टया सक्षमही आहे. ऋण काढून सण साजरा करणारा कोकणी माणूस मनाच्या श्रीमंतीने येणारे सणही तसेच उत्साहाने साजरा करतो. गणेशोत्सव म्हटला की कोकणातील कुणीही कुठेही व्यवसाय, नोकरीनिमित्त जगभरात असला तरीही तो या उत्सवासाठी घराकडे आल्याशिवाय राहात नाही. या उत्सव काळातले वातावरण भारलेले असते. या उत्सवाच्या निमित्तानेच कोकणी माणसांच्या मनाची श्रीमंतीही दिसते आणि उपजत असलेला अमाप उत्साही दिसतो. ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ म्हणत पुढील वर्षाच्या श्रीगणेशाच्या आगमनाची आस कोकणातील प्रत्येक मालवणी माणसाला लागलेली असते. गणेशोत्सवाचा असा उत्साह कोकणाइतका अन्यत्र कुठेही नाही.
आपला लाडका गणपती काही दिवस घराघरात चक्क राहायला येणार ही कल्पनाच किती अपूर्वाईची! तो आपल्या घरी, आपल्या सहवासातही, घरातल्या वडीलधा-या, आदाराचं स्थान असलेला, कुटुंबातील एक सदस्य म्हणून येऊन राहणार, ही भावना देवाशी आत्यंतिक जवळीक साधणारी.
आता घरात भजनांचे, आरत्यांचे, टाळ झांजांचे गजर घुमत आहेत. आरत्यांतील आर्तता स्वरांतून आणि तालांच्या एकतेतून प्रकट होणार आहे. वेदमंत्रातून आणि मंत्रपुष्पांजलीतून समर्पित भावनेनी प्रकट होणार आहेत. नमस्कारातील नमनातून भक्ती, आदर आणि श्रद्धेने घातलेले लोटांगण समर्पणाचं समाधान साधणार आहे.
आपणासमोरची प्रतिष्ठापना केलेली ती चतुर्भुज गणेशमूर्ती आनंदी होऊन हसतमुखाने, आपली भक्ती, श्रद्धा स्वीकारताना आपला अभयकर आपल्या मस्तकी ठेवून, आपल्या सर्व चिंता दूर करण्याचा, सर्वसंकटांचा नाश करण्याचा, सर्व संकल्प, सर्व स्वप्नं पूर्ण करण्याचा आशीर्वाद देणार आहे. या श्रीगणरायाच्या आश्वासक आशीर्वादाने तृप्त होऊन, प्रसन्न मनाने, आनंदाने, उत्साहाने आपण म्हणूया, ‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!