सिद्धटेक : अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची एकमेव मूर्ती

येथील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली. हे क्षेत्र भीमा नदीकाठी आहे. मधू व कैटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे श्री विनायकाची आराधना केली. श्री विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली. म्हणून येथील विनायकास सिद्धिविनायक म्हणू लागले व हे स्थान सिद्धटेक या नावाने ओळखण्यास येऊ लागले.

भीमा नदी येथे दक्षिणवाहिनी आहे. नदीच्या दक्षिण वाहिनी प्रवाहास अतिशय पवित्र मानण्यात येते. नदीला कितीही पूर आला तरी नदीच्या प्रवाहाचा आवाज या परिसरात होत नाही हे येथील वैशिष्ट्य होय. मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवळासमोर भव्य महाद्वार, फरसबंदी रस्ता पेशव्यांचे मामा हरिपंत फडके यांनी बांधला.


मूर्ती व गाभारा : श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती आहे. उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक म्हणतात. उजव्या सोंडेच्या गणेशाचे सोवळे कडक असते. मूर्तीचे सिंहासन पाषाणाचे आहे व प्रभावळ चांदीची आहे. गाभारा डोंगराच्या टोकाला असल्याने पूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते.


जवळची ठिकाणे : पेडगाव- किल्ला व भीमेकाठची प्राचीन मंदिरे, राशीन देवीचे मंदिर व झुलती दीपमाळ, दौंड-विठ्ठल व भैरवनाथाचे मंदिर

Tags :