बेगमपूरा येथील सिध्दीविनायक

बेगमपूरा येथील सिध्दीविनायक गणेश मंदिर, औरंगाबाद

बाल गणेशाने असुराचा वध केल्यावर, त्या राक्षसाच्या रक्ताने गणेशाचे अंग शेंदरासारखे माखले गेले होते. ही घटना औरंगाबाद शहरापासून ३५ कि. मी. अंतरावर असलेल्या खाम नदीच्या किनाऱ्यावरील शेंदुरवादा ह्या गावात घडली होती असा समज आहे. येथूनच गजाननाच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा सुरु झाली असावी असे म्हंटले जाते.

शेंदुरवादा या गावात इ. स. १७८४ साली बांधलेले “ सिंदुरात्मक “ नावाचे प्राचीन गणेश मंदिर आहे.

औरंगाबाद शहरात पण अनेक गणेश मंदिरात गणपतीच्या शरीरावर शेंदूर लावलेला दिसून येतो. असेच एक मंदिर शहरातील बेगमपुरा परिसरात असून त्यास सिद्धिविनायक गणेश मंदिर असे म्हंटले जाते.

हे मंदिर सिद्धिविनायकाचे असल्यामुळे येथील श्री. गणेश नवसाला पावतो, भक्तांचे कार्य सिद्धीस नेतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो असा विशास गणेशभक्तांमध्ये रूढ झालेला असून मोठ्या आशेने व मनात भक्तीभाव ठेऊन भाविक या मंदिराच्या दर्शनाला येतात.

बेगमपुरा येथील थत्ते हौदाजवळ सदर सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. अत्यंत साधेपणाने बांधलेले हे मंदिर रस्त्याच्या कडेला असून भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आत गेल्यावर मोठे सभागृह आहे व त्यामध्ये एका चौथऱ्यावर पारदर्शक काचेच्या पेटीमध्ये सदर गणपती ठेवलेला दिसून येतो.

श्रीगणेशाची मूर्ती अत्यंत आकर्षक असून मूर्तीच्या सर्वांगावर शेंदुराचा लेप लावलेला आहे. गणपतीची सोंड आकाराने मोठी असून उजवीकडे वळलेली आहे. ( उजव्या सोंडेच्या गणपतीलाच खरे तर सिध्दीविनायक म्हणतात ). गणपती चे डोळे बारीक आहेत तर सोंडेमागून आलेला एकच दात चांदीने मढविलेला आहे.

सिध्दीविनायकाला भरजरी फेटा बांधलेला आहे. शिरावर फेट्याची एकूणच बांधणी आणि त्यावरील अलंकार मूर्तीला साजेसे आहेत. त्यामुळे गणेशाची मूर्ती पारंपारिक भासते आणि भारदस्त दिसते.

मूर्तीला फुलांचे हार घातलेले आहेत, त्याशिवाय दुर्वा, गुलाबाची फुले आणि कापसाची वस्त्रमाळ मूर्तीवर शोभून दिसते. ह्या सुरेख, शेंदुरलेपनाने लाल झालेल्या मूर्तीच्या भाळी चांदीपासून तयार केलेल्या गंधाची प्रतिमा असून डोक्यावर चांदीच्या दुर्वा वाहिलेल्या आहेत.

सदर गणेशाच्या मूर्तीशेजारी आजून एक अगदी छोटीसी व साधी गणेश मूर्ती ठेवलेली दिसून येते.

ह्या मनमोहक गणपतीच्या मूर्ती समोर, काचपेटीच्या बाहेर, गणेशाची एक सुंदर, संगमरवरी पण छोटीसी मूर्ती ठेवलेली आढळून येते. भाविक याच मूर्तीस हळद, कुंकू, गुलाल, फुले, दुर्वा, बेल इत्यादी वाहतात व गणेशाच्या प्रती आपापली श्रध्दा व्यक्त करतात.

 

अशा या सुंदर सिध्दीविनायकाचे मनापासून दर्शन घेताच भाविक तृप्त होतात आणि अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने परततात. आपणही कधी बेगमपुरा परिसरात गेलात तर ह्या सिध्दीविनायकाचे दर्शन अवश्य घ्या.

Tags :