लोखंडे तालीम संघ, सार्वजनिक गणेशोत्सव

नारायण पेठ, पुणे स्थापना : १८९६ उत्सवी वर्ष : शतकोत्तर एकोणिसावे

स्थापना : १८९६ उत्सवी वर्ष : शतकोत्तर एकोणिसावे

सार्वजनिक गणेशोत्सवाला पुण्यात सुरुवात झाल्यानंतर पुढील एक-दोन वर्षांतच अनेक मंडळांची स्थापना होऊ लागली. १८९६ साली अप्पा बळवंत चौकातल लोखंडे तालमीतर्फे-देखील गणेशोत्सवाचे आयोजन होऊ लागले. लोखंडे तालमीचा हा गणपती तेव्हा अप्पा बळवंत चौक म्हणून ओळखला जात असे. केरबा कारळ, गणपतराव चक्के, म्हळबा वावरे, दगडोबा राक्षे, नाना उंदरे, नारायण बापू आढाव, बुवासाहेब शिंदे या मंडळींनी या उत्सवाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला होता. पहिल्या वर्षी केवळ साठ रुपये वर्गणी जमा करून त्यातून अडीच रुपयांची श्रीची मूर्ती आणून हा उत्सव साजरा केला जाऊ लागला. 
स्वातंत्र्यपूर्व काळात समाज जागरण, स्वातंत्र्य चळवळीला पूरक असे उपक्रम सादर करण्यावर सारा भर होता. मंडळाचे कार्यकर्ते द्राक्षे यांचा मेळा त्या काळी अतिशय गाजला होता. मात्र केवळ मेळे, व्याख्याने न करता मंडळांचे कार्यकर्ते नानासाहेब सोनवणे, शिंगटे बंधू, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात सक्रिय भाग घेतला होता. त्या वेळी इंग्रजांनी मेळ्यावर बंदी घातली. त्यामुळे चलेजाव आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंडळाच्या त्या वर्षीच्या मिरवणुकीत इंग्रजी क्यू आकाराचा फेर विसर्जनाच्या मिरवणुकीत धरण्यात आला होता. 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र सामाजिक कार्याकडे आणि प्रबोधनात्मक देखावे यांकडे मंडळाचा कल राहिला आहे. अनेक नामवंत कलाकारांनी या मंडळाला भेट दिली आहे. मा. दीनानाथ मंगेशकर यांचा पुण्यातील पहिला जाहीर कार्यक्रम याच मंडळापुढे झाला होता. १९६५ साली मंडळाने मुंबईचे शिल्पकार राम सारंग यांच्याकडून नवीन गणेशमूर्ती तयार करून घेतली. तीच आताची उत्सवमूर्ती आहे. मंडळातर्फे अनेक सामाजिक उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. रक्तदान शिबिरे, रिमांड होम, हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था, बेरू मतिमंद प्रतिष्ठान, कर्वे नगर अंध-अपंगांसाठी उपक्रम राबविले जातात. तालीम संघाने कुस्ती, हुतुतू अशा अनेक क्रीडा प्रकारांतदेखील प्रावीण्य प्राप्त केले आहे.

Tags :