गणपती बाप्पाचे नाव घ्या होळीत हे जाळा आणि दारिद्र्य टाळा

एकत्र येऊं सारेजण   विसरुन जाऊ भेदभाव

जाळून टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ//

ऐष आरामांत राहून     देह झाला मलीन

शरीर सुखासाठी करती    नाना खटपटी

आज आहे सण होळीचा   नष्ट करा ऐहिक भाव

जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव  //१//

मन असे चंचल भारी   सर्व दिशेने घेई भरारी

राग लोभ अहंकार      मनाचे तर हे विकार

टाकता मलीनता मनाची   पेटलेल्या होळीकडे, घे धांव

जाळून टाकू होळीमध्यें     दुष्ट असतील ते स्वभाव   //२//

विसरुनी चाललो मानवता     प्रत्येक बघतो स्वार्थता

विश्वासाचे आपले नाते     विसरुन गेले सारे ते

निस्वार्थी बुद्धीने आतां    जाणा इतर मनाचे ठाव

जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव

हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी मात्र पंचमीला रंग खेळतात त्याला रंगपंचमी म्हणतात.

या उत्सवाचा महत्वाचा भाग म्हणजे होळी पेटविणे. तो पौर्णिमेच्या दिवशी होतो. होळी म्हणजे सर्वांना गारठवून टाकणार्‍या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणार्‍या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम.

होळीस शिमगा हे नावही रूढ आहे, जुन्या काळी एक राक्षस मुलांना व लोकांना त्रास देत असे. त्याला पळून लावण्यासाठी आग पेटवून लोक बोंब ठोकत असत त्यामुळे या सणास शिमगा असे नाव पडले.

कथा

हिरण्यकशपू नावाचा एक राक्षस होता, तो स्वत:ला देव समजत असे. संपूर्ण राज्यभर सर्वांनी त्याची पूजा करण्याची त्याने सक्ती केली होती, पण त्याचाच पूत्र प्रल्हाद हा विष्णू भक्ती करू लागला. क्रोधात हिरण्यकशपू ने त्याचा अंत करावायचे ठरविले. हिरण्यकशपूची बहिण होलिका हिला अग्नीपासून संरक्षित राहण्याचे वरदान होते, यांचा उपयोग करून त्याने अग्नी पेटवून होलिकेला प्रल्हादास मांडीवर घेऊन अग्नीत बसावयास लावले. अग्नीत प्रल्हादाचे दहन करावे हा त्याचा हेतू होता. पण प्रल्हाद सुखरूप राहिला व होलिका दहन झाली. आपल्या शक्तीचा दुरुपयोग केल्याने ती दहन पावली, वाईट विचारावर सद्गुणांनी विजय मिळविला म्हणून या दिवशी होळी करण्याची परंपरा सुरु झाली असे मानतात.

होळी विषयी शंकरांची कथा असुन शंकर आपल्या तपाचरणांत गढून गेले असताना त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधावे व त्याच्या मनांत कामविकार निर्माण करावा म्हणून देवांनी कामदेव मदन याची योजना केली होती. परंतु आपल्या तपाचरणांत विघ्न निर्माण करणाऱ्या या मदनाला शंकरानी आपला तिसरा डोळा उघडून भस्म करून टाकला, या स्मरणार्थ पौर्णिमेला होळी पेटविली जाते, असे मानले जाते .

पूजाविधी

देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे शंकूच्या आकारात रचावीत. होळीभोवती सुरेख रांगोळी काढतात, तसेच फुलांच्या माळा लावून सुशोभित करतात.

व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर ‘होलिकायै नम:।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करावा.

या दिवशी प्रत्येक घराघरात पुरणाची पोळी करतात, व होळीला त्याचा नैवेद्य अर्पण करतात. जमलेल्यांना नारळ, अननस यांसारखी फळे वाटावीत. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत.

काही ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला गुलाल व रंग उडवून व एकमेकांना लावून ‘रंगपंचमी’ उत्सव साजरा करतात. यालाच वसंतोत्सव असेही म्हटले जाते. वृंदावनात कृष्ण गोप गोपिका समवेत रंगांची उधळण करीत नृत्य करीत असे त्याचे प्रतिक म्हणून आपण रंगपंचमी हा सण साजरा करीत असतो. निसर्गात रंगाची लयलूट चालू असते, त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करून रंग बनवून, एकमेकांना लावून आनंदोत्सव साजरा केला जात असे. शुद्ध केसर व गुलाबजल यांचे मिश्रण करून श्रीकृष्णाच्या मूर्तीला व घरातील लहान मुलांना त्याचा टिळा लावतात.

आपणही अशाच प्रकारे नैसर्गिक रंगांचा मर्यादित वापर करून रंगपंचमी साजरी करून या आनंदोत्सवात सहभागी होऊया

Tags :