आव्हाणेचा निद्रिस्त गणेश

निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार इथे पाहायला मिळतात. पण निद्रिस्त गणेशाचे मंदिर हे एकमेवाद्वितीयच असेल. नगर जिल्ह्य़ातील तीसगावपासून अंदाजे १५ कि.मी. अंतरावर आहे आव्हाणे हे गाव. मुख्य रस्त्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर एक सुंदर कमान बांधली आहे. गावात पूर्वी कोणी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहत होते. ते दरवर्षी मोरगावची वारी करायचे. वयोमानाप्रमाणे त्यांना वारी करणे झेपेना. तेव्हा त्यांना मोरया गोसावींचा दृष्टान्त झाला की आता त्यांनी वारी करू नये. तरीसुद्धा निस्सीम गणेशभक्त दादोबांनी आपला हट्ट सोडला नाही आणि ते वारीला निघाले. वाटेत असलेल्या ओढय़ाला मोठा पूर आला होता. मोरयाचे नाव घेऊन दादोबा त्या ओढय़ात उतरले खरे, पण पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहाबरोबर लांब वाहत गेले. वाटेत असलेल्या एका बेटावर ते थांबले असता त्यांना गणपतीचा दृष्टान्त झाला की मीच तुझ्या गावी येतो. कालांतराने दादोबा देवांचे निधन झाले. असे सांगितले जाते की त्यानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तो काय, एक स्वयंभू गणेशाची मूर्ती जमिनीत होती. दादोबा देवांच्या मुलाला, गणोबा देव याला दृष्टान्त झाला की ती मूर्ती आहे तशीच असू दे, त्याच अवस्थेत तिची पूजा कर. ती मूर्ती म्हणजेच हा निद्रिस्त गणेश होय. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. प्रशस्त बांधलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात जमिनीखाली दोन फुटांवर स्वयंभू गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात एका कोनाडय़ात ज्या गणेशाच्या मूर्ती आहेत त्या दादोबा देव आणि त्यांचा मुलगा गणोबा देव यांच्याच आहेत, असे सांगितले जाते. पूजेतली मूर्ती मात्र फक्त हीच निद्रिस्त गणेशाची. संकष्टी, अंगारकी आणि माघी गणेश उत्सव इथे मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. मंदिराचे प्रांगण प्रशस्त फरसबंदी आहे. चारही बाजूंनी िभतीलगत मोठा ओटा बांधलेला आहे. सुंदर असा सभामंडप नुकताच बांधून घेतलेला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली. मंदिराच्या बाजूला गणेशभक्तांच्या मुक्कामासाठी उत्तम असा भक्तनिवास बांधलेला आहे. निद्रिस्त गणेशाचे हे आगळेवेगळे आणि महाराष्ट्रातील बहुधा एकमेव मंदिर मुद्दाम जाऊन पाहण्याजोगे आहे.बहुधा महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असावे.

Tags :

निद्रिस्त गणेश