फडके गणपती

थोर गणेशभक्त हरीतात्या फडके हे माधवराव पेशव्यांचे पराक्रमी सेनापती होते. त्यांनी या गणेश मंदिराची उभारणी केली. त्यावरूनच फडके गणपती या नावाने हा गणपती ओळखला जातो. हे मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हेदेखील या गणपतीचे दर्शन घेत होते, असे संदर्भ दिसतात. सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलानजीक जयदेव नगर परिसरात हे मंदिर आहे.

मंदिराचा परिसर प्रशस्त आणि मन प्रसन्न करणारा आहे. मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेतो परिसरात असलेला जुना पिंपळ वृक्ष. मंदिराच्या सभोवतालचा परिसर हिरवाईने बहरला आहे. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. गाभाऱ्याच्या समोर ओसरी आहे. गणरायाची मूर्ती चतुर्भुज आहे. या पाषाणी मूर्तीवर शेंदराचा लेप दिला जातो. मूर्तीची उंची अंदाजे ३ फूट आहे. थोडीशी सोंड झुकवून श्रींची मूर्ती विराजमान झालेली दिसते. मूर्तीच्या वरच्या दोन हातांत परशू, अंकुश धारण केलेले दिसतात. खालील उजवा हात मांडीवर आणि डाव्या हातात मोदक आहे. गणेशाची सोंड मोदकावर वळलेली आहे. या मंदिरात गणेश जन्म मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मंदिराच्या आवारात गणेश मूर्तीच्या समोरच हनुमानाचे छोटे मंदिर आहे. अलीकडच्या काळात या मंदिराला विघ्नहर्ता गणेश असे नाव देण्यात आले आहे.

 

Tags :

#PuneGaneshFestival #Ganpati #PuneGanpati #फडकेगणपती #PhadkeGanpati