पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदाची मिरवणूक दोन तास अगोदर संपल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले

पुणे शहरातून गुरुवारी (दि.१२) सकाळी १०.१५ च्या सुमारास मानाचा पहिला कसबा गणपतीपासून सुरु झालेली गणेश विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.१३) सकाळी १०.३० मिनिटांनी संपली. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला एकूण २५ तास ३९ मिनिटांचा कालावधी लागला. पोलिसांनी योग्य नियोजन केल्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदाची मिरवणूक दोन तास अगोदर संपल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

यंदाच्या वर्षी शहरात ४ लाख ३३ हजार ९३० घरगुती आणि ३ हजार १९३ सार्वजनिक मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापणा केली होती. दहा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर गुरुवारी सकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील मध्यवस्तीतील अनेक रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

विसर्जन मार्गांवरील शहरातील मुख्य चार रस्त्यांवरुन म्हणजेच लक्ष्मी रोड (२९० मंडळे), टिळक रोड (१९६), कुमठेकर रोड (४६) आणि केळकर रोड (७०) अशी एकूण सुमारे ६०२ गणेश मंडळे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत मार्गस्थ झाली. यामध्ये अनेक मंडळांनी सामाजिक, चालू घडामोडींवर देखाव्याचा माध्यमातून भाविकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता.

यंदा गतवर्षीच्या तुलनेत डीजेचे प्रमाण कमी असल्याचे पहायला मिळाले. या विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी १९ मोबाईल चोरांना पकडले असून त्यांच्याकडून ८२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Tags :

#Pune #PuneGaneshFestival #PuneGanpati2019 #PuneGanpatiVisarjan2019