डोंबिवलीचे श्रीगणेश मंदिर संस्‍थान

डोंबिवली शहर गावठाण होते. ना नदी, ना डोंगर, ना झाडांनी वेढलेले. वा त्यांचे सान्निध्यदेखील न लाभलेले गाव. तरी निसर्गरम्य! भातशेतीची काळीशार जमीन, त्यावर सळसळणारी भाताची रोपे, त्यात उदंड श्रम करून पीक काढणारा शेतकरी-आगरी समाज, काही मोजकी सुशिक्षित कुटुंबे, संगीतावाडीच्या मागील बाजूला असणारे सावरीच्या कापसाचे दाट जंगल, तर गोग्रासवाडीच्या छोट्याशा टेकडीवरील उदंड गोधन असणारे गोपालकृष्णाचे मंदिर असे काहीसे चित्र डोंबिवलीचे होते. निसर्गरम्य डोंबिवलीत मोठे मंदिर १९२४ पर्यंत नव्हते. डोंबिवलीकरांना जवळच्या मोठ्या गावी जाऊन तेथील यात्रेत-जत्रेत सहभागी व्हावे लागत असे.

काही डोंबिवलीकर मंडळी पायवाटांच्या छोटेखानी गावात गावकर्‍यांना एकत्र येण्यासाठी जागा हवी या हेतूने एकत्र आली आणि त्यातून श्रीगणेशाची स्थापना करावी असा सत्यसंकल्प झाला. त्यानुसार श्रीगणेशाची स्थापना छोटेखानी समारंभाने २४ मे १९२४ रोजी (शके १८४६ वैशाख वद्य ४) ‘ग्रामदैवत’ झाली! त्याच दिवशी श्रीशंकर, श्रीमारूती, महालक्ष्मी यांचीही स्थापना तेथे केली गेली. कालांतराने, १९३३ मध्ये ब्रह्मीभूत स्वामी आनंदाश्रम यांच्या समाधिस्थळावर श्री गुरूदत्तात्रेय यांच्या प्रतिमेची स्थापना झाली. हळूहळू आसपास असणाऱ्या देवता ‘श्रीगणेश मंदिरा’च्या वास्तूत येऊन स्थिरावल्या - १९५० ला शंकर मंदिर, १९५८ ला मारूती मंदिर यांचा जीर्णोद्धार झाला.

मंदिर डोंबिवली आणि ठाकुर्ली स्टेशनांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मंदिराचे पहिले विश्वस्त मंडळ १९२६-२७ ला तयार झाले. मंदिराची पहिली घटना १९३६ ला लिहिली गेली. त्या घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळी जातीयतेची सर्व बंधने झुगारून मंदिर सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. सर्व सामाजिक उपक्रमांचा समावेश घटनेत होता हे मोठे आश्चर्य मानले जाते. गावाच्या गरजेतून क्रियाकर्म ही सुविधा वास्तूत१९४२ मध्ये सुरू झाली. त्याचे नवे स्वरूप देखणे आहे. प्रतिदिन किर्तन, प्रवचन ही बोधपर सेवा १९५० पासून नित्यनेमाने चालू आहे. मात्र त्यांचे स्वरूप बदलले आहे. ज्ञानयज्ञात कै. शिरवळकरबुवा, निजामपूरकरबुबा, करमरकरबुवा, पटवर्धनबुवा, कोपरकरबुवा यांसारख्या दिग्गज कीर्तनकारांनी कीर्तनसेवेच्या समिधा घातल्या. त्यांना कोणताही मोबदला दिला जात नव्हता. उलट, कीर्तनकारच आठ आणे दान देऊन कीर्तन-प्रवचने करत असत. निष्काम सेवेचा तो अनुभव विलक्षणच!

संस्थेची आर्थिक स्थिती जसजशी सुधारू लागली तसतशी मंदिराची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुनर्रचना/पुनर्बांधणी करणे आवश्यक वाटू लागले. विश्वस्त मंडळाने नागरिकांची सभा बोलावून पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला. प्रभुराम ओतुरकरांनी आराखडा देऊन कामास सुरुवात केली. रेल्वे चीफ इंजिनीयर माधवराव भिडे हे त्या वर्षी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. वास्तुविशारद मेसर्स एस. के. गोडबोले आणि आठल्ये यांच्या आराखड्याप्रमाणे सध्याचे मंदिर उभे राहिले. वास्तूची उल्लेखनीय बाब अशी, की मंदिरावरील कळसाची रचना ही पूर्णपणे आधुनिक पण त्याच बरोबर श्रद्धा व भावना यांची जपणूक करून त्यांचा समन्वय साधणारी आहे. मंदिरामध्ये एके काळी शेकडोंनी जमणारे भक्तगण लक्षात घेऊन सभामंडपात मोकळी व स्वच्छ हवा कशी खेळती राहील याचा विचार केला गेलेला आहे. तसेच, भजनप्रसंगीचा टाळांचा गजर, प्रवचने व व्याख्याने यांच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा वापर या संदर्भातील तांत्रिक परिपूर्णता कळसाच्या उंचीशी स्पर्धा करणारी आहे. मंदिराच्या तीस फूटांच्या गाभाऱ्यात कोठेही खांब नाही! दगडाचा वापर कोठेही केलेला नाही! सगळीकडे संगमरवरी बांधकाम आहे. त्यामुळे मंदिरात स्वच्छता राखली जाते आणि प्रसन्नता वाटते.

Tags :