ग्रामीण पथकांनी आणला मिरवणुकीत जोश

ग्रामीण भागात पूर्वी मनोरंजनाची साधने मर्यादित होती. दिवसा शेतीची कामे करून मंडळी सायंकाळी घराकडे परतत. रात्रीच्या जेवणानंतर गावातले वयस्क मारुतीच्या पारावर नाहीतर विठोबाच्या देवळात भजन-कीर्तनासाठी एकत्र येत आणि टाळ-मृदंगाच्या साथीत भजन म्हणून मध्यरात्रीला घरी परतत. तरुण पोरं-बाळं संध्याकाळी तालमीत रग जिरवून आल्यानंतर आपली उर्वरित ऊर्जा ढोल-ताशा-लेझीम-झाजांच्या वादनात व्यतीत करीत असत. हातात रेशमी गोंडे लावलेल्या झांजा, कमरेला भगवी लुंगी, अंगात बनियन किंवा भगवा टी-शर्ट, व्यायामाने सुदृढ बनलेले गोटीबंद शरीर अशा रूपात ही तरुण मंडळी वादनात रंगून जात. ढोल-ताशाच्या प्रचंड गजरावर झांजा-लेझीम खेळताना त्यांना जगाचा विसर पडायचा. अंगावरून घामाच्या धारा वहात असतानाही पायाचा ताल मात्र चुकायचा नाही. या मंडळींनी शहरातल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका धुंद करून टाकल्या. मंडळाच्या मांडवापाशी येताच हातावर भाकरी घेऊन गोल करून खाणारी ही मंडळी नंतर आपल्या ऊर्जेच्या जोरावर तमाम अबाल-वृद्धांना थिरकायला लावायची. एकूणच या खेळात एक प्रकारचा मर्दानी रांगडेपणा असायचा.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture