वाईमधील धुंडिविनायक

हे मंदिर कोणी बांधले याची माहिती उपलब्ध नसली तरी त्याचे स्थापत्य आणि नक्षीकाम, शिल्प आणि मंदिराशी असलेली परंपरा त्याचे प्राचीनत्व सुचवतात. मंदिराला साक्षात शिवाजी महाराजांनी वर्षांसन लावून दिलेले होते, त्यावरून हे मंदिर शिवपूर्व काळातील आहे, एवढे निश्चितपणे सांगता येते.

साताऱ्यापासून ३५ कि.मी. आग्नेयेला वाई हे एक छोटेसे नगर आहे. जीवनदात्री कृष्णा नदी ज्या गावातून वाहते, सातवाहन काळातील बौद्ध गुंफा गावाच्या अगदी जवळ असलेले आणि आज मात्र फक्त महाबळेश्वरच्या वाटेवरील एक छोटे निसर्गरम्य गाव ढोल्या गणपतीसाठी आणि कृष्णाबाईच्या उत्सवासाठीच प्रसिद्ध आहे. या गावाजवळील िलब, किकली ही अपरिचित वारसा स्थळे या गावाजवळ असूनही उपेक्षित आहेत. पण या सर्वावर कळस म्हणजे खुद्द वाईमध्ये ब्राह्मणशाही नावाच्या भागात असलेले धुंडिविनायक मंदिर. खरं तर वाई म्हटलं की ढोल्या गणपती तसेच कृष्णेच्या घाटावरची इतर मंदिरे आठवतात. वाईमध्ये आलेले सगळे पर्यटक या मंदिरांना भेटी देतात. मेणवली, धोमेश्वर यासारखी प्रसिद्ध ठिकाणेही पर्यटकांची गर्दी खेचतात. पण खरे पहिले तर वाईमधील सर्वात जुने असे उभे असलेले मंदिर म्हणजे धुंडिविनायक मंदिर मात्र खुद्द वाईकरांनाही फारसे महत्त्वाचे वाटत नाही. परंपरेने या मंदिराचा सांभाळ साबणे कुटुंबीय करत आहेत. हे मंदिर कोणी बांधले याची माहिती उपलब्ध नसली तरी त्याचे स्थापत्य आणि नक्षीकाम, शिल्प आणि मंदिराशी असलेली परंपरा त्याचे प्राचीनत्व सूचित करतात.

हे मंदिर नदीच्या काठावरती एका पीठावर बांधले आहे. त्यावर बा भागावर काही शिल्पे कोरली आहेत. त्यामध्ये हनुमान, काही योगी, पायामध्ये हत्ती पकडलेले वाघ अशी शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशाच्या दरवाज्यावरच्या ललाटबिंबावर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरलेले आहे. त्या शिल्पाच्या खालच्या बाजूला गणपतीचेही शिल्प कोरलेले आहे. दाराच्या उंबरठय़ावर कीíतमुख कोरले आहे. मंदिराच्या मंडपात टेकून बसण्यासाठी कक्षासने आहेत. मंडपात दगडी स्तंभ आहेत. संपूर्ण बांधकाम हे मोठय़ा दगडातच केले आहे. गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे; परंतु त्याचे वाहन उंदीर मात्र त्याच्या समोर नसून जरा बाजूला िभतीपाशी ठेवला आहे. मूळ मंदिरापेक्षा उशिराच्या काळातली एक नरस्िंाहाची मूर्तीही गाभाऱ्यात आहे आणि तशीच पण जरा जुनी वाटणारी एक मूर्ती मंदिराच्या अंगणातील एका दगडी देवळीतसुद्धा ठेवली आहे. या मंदिराचे शिखर विटांचे असून त्याची वेळोवेळी डागडुजीही झालेली आहे.

या मंदिराच्या आवारात सहा संन्याशांच्या समाध्याही आहेत. त्यांची नावे जरी माहीत नसली तरी त्या संन्याशांच्या आहेत हे लोकांना माहीत आहे. तसेच मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या िभतीवरील साधना करणाऱ्या योग्याचे शिल्प आहे. त्यामुळे या मंदिराचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे हे लक्षात येते. या मंदिराच्या संबंधी एक मोडी कागद साबणे दप्तरामध्ये होता. तो डॉ. ग. ह. खरे यांनी वाचला होता. त्यांनी त्यावरून सांगितले होते की, या मंदिराला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षांसन लावून दिले होते आणि ते आम्ही पुढे चालवत आहोत, असा छत्रपती शाहू महाराजांचा एक आदेश होता. तसेच त्यांनतर इंग्रज सरकारनेही तेच वर्षांसन पुढे सुरू ठेवले असेही कागद विश्वस्तांकडे आहेत. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम शिवपूर्व काळातील आहे हे स्पष्ट होते. वाईमधील इतर मंदिरांचे बांधकाम हे पेशवाईतील असल्यामुळे त्यामध्ये हे सर्वात प्राचीन ठरते. यादवकाळ ते शिवकाळ यांमधल्या काळातील फारशी मंदिरे सापडत नाहीत त्यामुळे या मंदिराचे महत्त्व अपरंपार आहे; परंतु हा वाईमधील वारसा मात्र संपूर्णपणे उपेक्षित आहे. त्याची स्थानिकांनी आणि पर्यटकांनी दखल घेणे आवश्यक आहे.

Tags :

Wai, Maharashtra, PuneganeshFestival