कार्यकर्त्यांसह गणरायाचाही फेटय़ात रुबाब

गणेशमूर्तीच्या मस्तकी घालता येणाऱ्या फेटे, पगडय़ांना मागणी; फेटा बांधण्यासाठी विशेष कारागिरांचीही मदत

गणेशोत्सव आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुकीत एकाच रंगाचे फेटे मस्तकी धारण करून मिरवणारे कार्यकर्ते दरवर्षीच पाहायला मिळतात. मात्र यंदा गणेशमूर्तीच्या मस्तकावर परिधान करता येणाऱ्या फेटे आणि पगडय़ांचीही मागणी वाढत आहे. अगदी ५५० रुपयांपासून १२५० रुपयांपर्यंत मिळणारे हे फेटे बांधून देणाऱ्या विशेष कारागिरांनाही पाचारण करण्यात येत आहे.

गणपती मिरवणुकांमध्ये डोक्याला एकसारखे फेटे किंवा पगडय़ा बांधण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजली आहे. यासाठी लालबाग आणि दादरच्या बाजारातील ‘रेडी टू वेअर’ पद्धतीच्या तयार फेटे आणि पगडय़ांना मोठी मागणी आहे. खासकरून कोल्हापुरी फेटा आणि पुणेरी पगडीला विशेष पसंती मिळत असल्याचे व्यापारी सांगतात. मात्र आता आपल्या गणपतीसाठीही तुरेवाला फेटा किंवा पगडीची मागणी होत आहे. मूर्तीच्या मुकुटच्या आकारमानाप्रमाणे फेटा किंवा पगडी तयार करण्याची मागणी घेऊन गणेशभक्त व्यापाऱ्यांकडे जात आहेत.

मागणी वाढल्यामुळे गणेशमूर्तीसाठी खास पद्धतीचे ‘रेडी टू वेअर’ फेटे आणि पगडय़ा लालबाग आणि दादरच्या बाजारातील काही व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यावर मोत्यांच्या माळा, तुरा आणि एखादे पदक लावून त्यांची सजावट करण्यात येते. सध्या ८ ते २४ इंचापर्यंतचे ‘रेडी टू वेअर’ फेटे आणि पगडय़ा दुकानात उपलब्ध असल्याची माहिती दादरच्या ‘साडीघर’चे मालक गौरव राऊत यांनी दिली.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture