बाप्पा comming soon….

मोजकेच  हो हो आता फक्त 26-27 दिवस बाकी आहेत, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला देशभरात आणि खासकरून महाराष्ट्रातील सर्वजण आतुरतेने वाट पाहतात ते याच सणाची अर्थात ‘गणेश चतुर्थीची’..१० दिवस चालणारा हा गणेशोत्सव आता फक्त १० दिवस नाही तर महिना भरापूर्वीपासूनच सुरू होतो, असे दिसून येऊ लागले आहे. म्हणजे आता मुंबईचचं घ्या, मोठी मोठी मंडळं आपल्या बाप्पाचा पाद्यपूजन सोहळा, आगमन सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. दोन-तीन महिने आधी पाद्यपूजन सोहळा अगदी रितसर सगळी पूजा-अर्चना करून पार पडतो. सकाळपासून हा सोहळा सुरू होतो आणि मग रात्री या मंडळांतील तरुण मुलं-मुली बॅन्जो पथक, ढोल-ताशा पथक मागवून मस्तपैकी एन्जॉय करतात. यानंतर बाप्पाच्या आगमनापर्यंत मग मंडप, देखावे तसेच १० दिवस चालणा-या बाप्पाच्या सोहळ्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन यात सर्वजण व्यस्त होतात. यात कसे दिवस निघून जातात हे काही कळते न कळते तोच येतो आगमन सोहळा. सध्या तरुणाईसाठी अतिशय महत्त्वाचा असा असणारा हा आगमन सोहळा म्हणजे एक प्रकारचे डी-जे कॉन्सर्ट म्हटले तर काही वावगं ठरणार नाही. अगदी शहराच्या मध्यभागी लालबाग-परळ परिसरात प्रत्येक राजाच्या आपापल्या जंगी मिरवणुका निघतात.

परळच्या कार्यशाळेपासून सुरू होणा-या या मिरवणुका मग थेट निघतात त्या आपापल्या मंडपांकडे. यात मग सर्वात भव्य अशी मिरवणूक म्हटली तर ती मुंबईच्या सर्वात जुन्या गणपती मंडळांपैकी एक अर्थात ‘चिंचपोकळीच्या चिंतामणीची’. आपल्या आगमन सोहळ्यामुळे स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणा-या चिंतामणीच्या मिरवणुकीला शहरातून काय तर राज्यातून विविध तरुण भाविक मुंबईत या दिवशी हजेरी लावतात. गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीपासून विविध मंडळांचे आगमन सोहळे पार पडू लागतात. कार्यशाळांपासून सुरू होणा-या या मिरवणुकांमध्ये बॅन्जो पथक, ढोल ताशा पथक यासह डी-जे देखील लावला जातो. मग रस्त्याच्या मध्यभागी निघणा-या या मिरवणुकांमध्ये तरुण-तरुणी अगदी बेधुंद होऊन गाण्यांवर थिरकताना दिसून येतात. विशेष म्हणजे यावेळी अगदी लहानग्यापासून ते मोठय़ापर्यंत सर्वचजण या मिरवणुकीत असतात. मुलांसह तितक्याच प्रमाणात मुलीही यात सामील होतात. ब-याच मंडळांचे आगमन सोहळे एकाच दिवशी असल्याने वेगवेगळ्या मंडळांकडून वेगवेगळ्या प्रकारची पथके बोलावण्यात येतात. त्यामुळे या सोहळ्याला येणा-या प्रत्येकाला वेगवेगळ्या पथकांच्या तालावर ठेका धरता येतो. असा हा एखाद्या लाइव्ह कॉन्सर्टलाही लाजवेल असा आगमन सोहळा सर्व तरुणांच्या सहभागाने मोठय़ा उत्साहात पार पडतो. यानंतर एकदा का बाप्पाची मूर्ती मंडपात बसली, की प्रत्येक कार्यकर्ता अगदी घरी एखादा पाहुणा आल्याप्रमाणे सतत लगबगीने काहीतरी तयारी किंवा व्यवस्था करताना दिसून येत असतो. या गडबडीत मग उजाडतो दिवस गणेश चतुर्थीचा. या दिवशी देखील काही मंडळे आपले गणपती आणतात.

मात्र हा दिवस असतो तो घरगुती गणपतींसाठी. बहुतेक मराठी घरांत गणपती बसविण्याची प्रथा अजूनही असल्याने आजही मोठय़ा उत्साहाने लोक आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणतात. तर बरेचशे लोक आपल्या मूळगावी जाणे पसंत करतात. यात विशेषत: कोकणी बांधवांचा समावेश असतो, म्हणजे एखादा कोकणी माणूस एकवेळ कोणतीही सुट्टी सोडू शकतो, मात्र गणपतीची सुट्टी ही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची असते, त्याला कारणही तसेच. कोकणचा गणेशोत्सव म्हणजे अगदी भारी.. पावसाच्या रिमझिम सरीत बाप्पाचे आगमन, मोदकाचा प्रसाद, बाल्या डान्स, वेगवेगळी नाटके अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी भरलेला असा कोकणचा गणेशोत्सव प्रत्येकाने एकदा तरी अनुभवलाच पाहिजे. यानंतर आता माझे मूळ गाव म्हणजे कोल्हापूर मधले गणेशोत्सव. हा तसा खास. यातील सर्वात मोठी खासियत म्हणजे सजीव देखावे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील माझे शिवारे गाव. यातील सजीव देखावे अर्थात नाटिका या आमच्या पंचकृशीत प्रसिद्ध गावातील वेगवेगळी मंडळे आपल्या सभासदांबरोबर आपापसातीलच कलाकर आणि लेखक यांच्या मदतीने ही नाटकं बसवतात आणि गणेशोत्सवाला सुरुवात होताच १० दिवस हे सजीव देखावे गावक-यांना दाखविले जातात. प्रत्येक मंडळ एकमेकांच्या वेळेनुसार आपापली नाटके सादर करतो. मग काय आमच्या गावात संध्याकाळी ८ ते ११ संपूर्ण गाव थेट पारावरच जमलेला असतो. घरादाराला कुलूप लावून सर्वजण थेट देवळावर नाटिका बघायले.

अगदी मुंबईला शिकायला किंवा कामाला असणारी मुलंदेखील या दिवसांत आवर्जून गावाकडे येतात, तर काही गावांकडील लोक अशावेळी मुंबईला येणे देखील पसंत करतात. मुंबईतील भव्य-दिव्य गणपतीच्या मूर्ती पाहायला राज्यभरांतून भाविक मुंबईत येतात, मग लालबागच्या राजापासून गणेशगल्ली, चिंतामणी करत सर्व खेतवाडीचे गणपती पाहतात. विशेष गोष्ट म्हणजे गणेशोत्सवाचे १० दिवस मुंबईकर झोपतात की नाही असाच प्रश्न मला पडतो, म्हणजे अगदी रात्रीच्या ३-४ वाजता देखील संध्याकाळी ७ वाजल्याप्रमाणे मुंबईच्या रस्त्यावंर गर्दी असते, तशीच अवस्था ट्रेनमध्ये देखील, गणपती बाप्पा मोरया म्हणत तरुण-तरुणीच नाही तर सगळीच्या सगळी कुटुंब मिळून मुंबई डोक्यावर घेतात. त्यात परळच्या राजाच्या येथे असणारे पाळणे वगैरे गणेशोत्सवाला अगदी जत्रेचे स्वरूपच आणतात. मग हे १० दिवस प्रत्येक जण आपल्याला हव्या त्या बाप्पाचे दर्शन घेत असतो. बच्चे कंपनीपासून, तरुणाईसह ज्येष्ठही गणेशोत्सव हा सण पूर्ण जल्लोषात साजरा करतात. अशा या उत्साह आणि उमंगमध्ये हे १० दिवस अगदी पापणी लवेपर्यंत निघून जातात आणि येते अनंत चतुर्दशी अर्थात आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ.. मोठय़ा थाटामाटात आलेला बाप्पा त्याच थाटात पुन्हा आपल्या घराकडे जाण्यासाठी निघतो. तशाच भव्य मिरवणुकीत तशीच गर्दी, तेच भक्त फरक मात्र एवढा की येताना उत्साहामुळे आनंदाने भरलेले डोळे यावेळी मात्र किंचित पाणावलेले असतात. आपल्या लाडक्या देवाचा निरोप घेणे जड जात असताना देखील ‘‘पुढच्या वर्षी लवकर या’’ असे म्हणत स्वत:च्या मनाची समजूत काढत प्रत्येकजण बाप्पाला अलविदा करतो आणि पुन्हा वाट पाहू लागतो पुढच्या वर्षीच्या आगमनाची..!

 

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture