सारसबागेतील सिद्धिविनायक उर्फ तळ्यातला गणपती

पुण्याची वाढती पाण्याची गरज पाहून नानासाहेब पेशव्यांनी इ.स. १७५४ मध्ये आंबील ओढ्याच्या प्रवाह बदलून २५ एकरचे मोठे तळे बांधले. त्याला 'पर्वती तळे' असे नाव होते. तळ्यात एक छोटे बेट राखून तिथे एक बाग बांधली. बेटावर निरनिराळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गशोभा वाढविण्यात आली. तिचे नाव सारस नावाच्या पक्ष्यावरून "सारसबाग" ठेवले गेले.

 
नानासाहेबांनी राखलेल्या सारसबागेच्या बेटावर पुढे त्यांच्या नातवाने म्हणजेच श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी इ.स. १७८४ मध्ये एक दगडी मंदिर बांधले. तेथे उजव्या सोंडेच्या संगमरवरी गणेशाची स्थापना केली. ह्या सिद्धिविनायकाचे मंदिर तळ्यात असल्याने त्याचे नाव "तळ्यातला गणपती" असे रूढ झाले. अगदी आत्ताआत्तापर्यंत हे ठिकाण याच नावाने ओळखले जायचे. 
 
पुढे पुणे महानगरपालिकेने उपेक्षित तळ्याच्या जागेवर स्वच्छता करून बाग तयार केली. तिला ''सारसबाग'' असे  विस्मरणात गेलेले जुने नाव दिले. सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे.

Tags :

#PuneGaneshFestival #Ganpati #PuneGanpati #SarasBag