श्री सिद्धिविनायक मंदिर - मुंबई

जुने मंदिर गुरुवार, १९ नोव्हेंबर १८०१ रोजी बांधले गेले. आपल्या हिंदू पंचांगानुसार, ती तिथी "दुरमुख संवत्सर"मधील कार्तिक शुद्ध चतुर्दशी, शके १७२३ ही होती. त्याचे बांधकाम क्षेत्र ३.६० मीटर x ३.६० मीटर इतके होते. ती तळमजल्याचीच रचना होती (चित्र क्रं. १ बघा). त्याला ४५० मिमी जाडीच्या विटांची भिंत होती, जुन्या प्रकारचा घुमट, पुन्हा त्यावर विटांचे कळस होते. घुमटाभोवती, ग्रीलसह असलेल्या पॅरापेट वॉलची मंदिराची रचना होती. मंदिराचा जमिनीचा स्तर आणि रस्त्याचा स्तरर सारखाच होता.हे मंदिर प्रभादेवी परिसरातील काकासाहेब गाडगीळ मार्ग आणि एस.के.बोळे मार्ग या रस्त्यांच्या कोपऱयावर उभे असून या परिसरात वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्या काळातील एक बांधकाम व्यावसायिक कै. लक्ष्मण विठु पाटील यांनी माटुंग्याच्या आग्री समाजातील एक श्रीमंत महिला कै. सौ. दिऊबाई पाटील यांच्याकडून प्राप्त झालेले अर्थसहाय्य आणि सूचनांनुसार या मंदिराची निर्मिती केली. कै. सौ. दिऊबाई पाटील यांच्याकडे लक्ष्मीची संपन्नता होती मात्र त्या अपत्यहीन होत्या.कै.दिऊबाई यांनी एकदा गणेशाची पूजा करताना त्याला मनापासून आळवत म्हटले, देवा, मला अपत्यसुख मिळू शकले नाही. पण तुझ्या मंदिरात येऊन तुझी पूजा-अर्चना करणाऱया इतर अपत्यहीन स्त्रियांना तरी मूल होण्याचे हे सुख प्राप्त होऊ देत. दिऊबाईंना या प्रार्थनेतूनच सिद्धिविनायकाचे मंदिर उभारण्याची प्रेरणा मिळाली. आज या मंदिराच्या सफल इतिहासाचा आढावा घेताना असे म्हणावे लागेल की, कै. दिऊबाईं पाटील यांचे निर्मळ आचार-विचार आणि त्यांच्या कळकळीच्या विनंतीस सिद्धिविनायकाचे आशीर्वाद लाभले. त्यामुळेच आज सिद्धिविनायक हा नवसाचा गणपती किंवा नवसाला पावणारा गणपती म्हणून सर्व भक्तगणांमध्ये प्रसिद्ध आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती ही एकाच अखंड काळ्या पाषाणातून घडविलेली असून २’६” (७५० मि.मी.) उंच आणि २‘ (६०० मि.मी.) रूंद आकाराच्या या मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. मूर्तीच्या वरील उजव्या हातामध्ये कमळ व वरील डाव्या हातात अंकुश आहे, तर खालील उजव्या हातात मोत्यांची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेले पात्र ठेवलेले आहे. गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उदरावर उजवीकडे रूळणारा सर्पहारदेखील आहे. सिद्धिविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकराच्या तृतीय नेत्राप्रमाणे भासतो. श्रीगणेशाच्या दोन्हीं बाजूंना रिद्धी आणि सिद्धी या देवता विराजमान झालेल्या आहेत आणि त्या गणेशाच्या मूर्तीच्या पाठीमागून वाकुन पहात असल्याप्रमाणे दिसतात. श्रीगणेशाबरोबर या दोन्ही देवतांची स्थापना केलेली असल्याने हे मंदिर सिद्धिविनायक गणेश मंदिर म्हणून ओळखले जाते. या देवता यश, धन, ऐश्वर्य आणि समृद्धीच्या देवता आहेत. 

जवळपास १२५ वर्षांपूर्वी श्री.अक्कलकोट स्वामी समर्थांचे परमभक्त कै.श्री.रामकृष्ण जांभेकर महाराज, जे श्रीगणेशाचे आणि गायत्री मंत्राचेही मोठे भक्त होते.त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती. एके दिवशी स्वामी समर्थांनी श्री.जांभेकर महाराजांना पवित्र मूर्ती आणण्यास सांगितले. जांभेकर महाराजांनी आणलेल्या मूर्तींपैकी दोन मूर्ती वगळून अन्य मूर्ती या स्वामी समर्थांचे अजुन एक परमभक्त श्री.चोळप्पा यांच्या घरासमोरच्या अंगणातील जमिनीत पुरण्यास समर्थांनी सांगितले. श्री.चोळप्पा यांच्या घरी समर्थ कधीकधी वास्तव्य करीत असत. उर्वरित दोन मूर्ती या श्री.जांभेकरांच्या नित्यपूजेतील श्रीगणेशापुढे पुरण्यासही समर्थांनी त्यांना सांगितले. स्वामी समर्थांबरोबरच्या सहवासातील या काळात श्री.जांभेकर यांच्याकडे समर्थांनी असेही भाकित केले की २१ वर्षांनंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल. त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल.काही वर्षांनी जांभेकर महाराज, ज्यांचा मठ दादर, मुंबई येथे समुद्र किनाऱ्यालगत आहे, त्यांनी कै.पुजारी श्री.गोविंद चिंतामण फाटक यांना श्री सिद्धिविनायकाची नित्यपूजा-अर्चनेची व्यवस्था पाहण्यास सांगितले. पुजारी फाटक यांच्यापूर्वी कै.नामदेव केळकर हे मंदिरातील पौरोहित्य करीत असत.उपलब्ध माहिती आणि नोंदींनुसार मंदिराचा परिसर हा साधारणपणे २५५० चौ.मीटर इतका होता. मंदिराच्या पूर्व आणि दक्षिण बाजूस एक तळे होते, जे अंदाजे ३०x४० चौ.मीटर इतक्या आकाराचे होते. १९व्या शतकाच्या सुरुवातीस, या परिसरातील दुष्काळस्थितीवर मात करण्यासाठी नार्दुल्ला यांनी हे तळे बांधले होते. मात्र कालांतराने हे तळे बुजवले गेले आणि आता तिथे एक खेळाचे मैदान आणि काकासाहेब गाडगीळ मार्गाचा काही भाग आहे.या परिसरात धर्मशाळेसारखे एक विश्रांतीगृहदेखील होते. तसेच ३.६ उंच, दगडी दीपमाळांची एक जोडी इथे उभारण्यात आलेली होती. या मंदिर संकुलाच्या मालकांकरिता एक निवासस्थानही इथे उभारण्यात आले होते. सुरूवातीच्या काळात मंदिराच्या आसपासच्या परिसरात निवासी आणि व्यापारी इमारतींचे प्रमाण फारसे नव्हते. १९५२ नंतर या मंदिरात येणाऱया भक्तगणांची संख्या वाढली आणि १९६५ नंतर इथे भक्तांच्या लांबचलांब रांगाही दिसू लागल्या.

या जागेच्या मालकांनीच मूळ जमिनीचे विभाजन करून विविध व्यक्तींना पोटभाडेपट्टयाने जागा वापरण्यास दिल्यामुळे जुन्या मंदिराच्या भोवतालचे उपलब्ध क्षेत्र आक्रसले आणि कालांतराने खूप कमी जागा शिल्लक राहिली. १९७५ नंतर मंदिराच्या भौमितिक क्षेत्रफळाच्या तुलनेत मंदिरात येणाऱया भक्तगणांची संख्या खऱया अर्थाने वाढू लागली. मंदिराच्या दोन लहानशा दरवाजांमधून मंदिरात प्रवेश करणे भक्तांना अवघड जाऊ लागले आणि मंदिरात येणे किंवा अगदी श्रीगणेशाचे दर्शन घेणेदेखील खूप कठीण होऊन बसले. 

Tags :

siddhivinayak mandir mumbai