कै नागेश शिल्पी यांनी बनवलेल्या या विलोभनीय मूर्तीला 'गरुड गणपती' असे नाव का पडले.

लक्ष्मी रस्त्यावर अलका चित्रपटगृहाकडे जाताना येणाऱ्या शेवटच्या चौकात गरुड गणपती मंडळ आहे. या मंडळाचे 'गरुड गणपती' असे नाव का पडले? या मंडळाच्या देखण्या मूर्तीविषयी मंडळाचे अध्यक्ष कैलास कांबळे यांनी माहिती उपलब्ध करून दिली. १९४४ मध्ये या मंडळाची स्थापना झाली. सुरुवातीस 'गणेश मंडळ' असे नाव होते. सार्वजनिक उत्सव असला, तरी येथील दौंडकर कुटुंबीयांच्या घरातच गणपती बसत असे. १९४७ मध्ये जागा कमी पडू लागल्याने माधवराव जाधव यांच्या वाड्याच्या कट्ट्यावर उत्सव साजरा होऊ लागला.

१९५० मध्ये गणपती लक्ष्मी रस्त्यावर बसू लागला, तेव्हा 'बालसेवक गणेश मंडळ' असा नावात बदल करण्यात आला. याच सुमारास मंडळाचे गंगाराम माथफोड हे कार्यकर्ते नवयुग स्टुडिओत सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. तेथे तुकाराम महाराजांचे वैकुंठागमनाचे दृश्य चित्रित करण्यासाठी १२ फूट उंच व २५ फूट रुंद असा गरुड तयार करण्यात आला होता. दृश्य चित्रित झाल्यावर तो माथफोड यांनी मंडळातील सजावटीसाठी आणला. त्या वर्षी मंडळाचा गणपती या गरुडावर बसवून मिरवणुकीत आणण्यात आला; परंतु गरुडाचे पंख रस्त्याच्या रुंदीत मावेनात, तेव्हा पंख दुमडून घेण्यात आले. मंडळाचे हे चलतचित्र पाहण्यास तेव्हा दूरदूरहून लोक आले होते. या गरुडामुळेच मंडळाचे 'गरुड गणपती' असे नाव पडले.

गरुडावर बसलेल्या या गणपतीची आरती करण्यास तेव्हा शिडीवरून जावे लागत होते. मंडळाची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार कै. नागेश शिल्पी यांनी हडपसर येथे तयार केली आहे. मूर्तीच्या पोटात विधीपूर्वक गणेश व महालक्ष्मी यंत्र बसविले आहे. शिल्पी यांनी प्रथम संकल्पित मूर्तीचे रेखाचित्र काढून दाखविले व त्यानंतर एक फूट उंचीची मूर्ती घडवून दाखविली आणि ती पसंत पडल्यावर मूर्ती घडविण्यात आली. या मूर्तीला काचेचे डोळे असून, मुकुटावर कीर्तीमुख आहे. ही मूर्ती ग्रहणात घडविण्यात आली असून, १९७६ मध्ये उत्सवासाठी आणण्यात आली. या मंडळाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गेली ५० वर्षे येथे हिंदी गाणी वाजवली जात नाहीत.

- श्री. मंदार लवाटे
(लेखक इतिहास अभ्यासक आहेत.)

Tags :