श्रीलंबोदरानंद स्वामी यांचे समाधी स्थानावरील श्री गणेश

श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेने गणेशदीक्षा घेणारे श्रीलंबोदरानंद स्वामी यांचे समाधी स्थानावरील श्री गणेश श्रीरामसिद्धिविनायकालगत, कनकेश्वर, ता. अलिबाग, जि. रायगड

कनकेश्‍वर या अतिप्राचीन स्थानाजवळ श्रीलंबोदरानंद स्वामी स्थापित श्रीरामसिद्धिविनायक मोठ्या दिमाखात विराजमान आहेत. त्या शेजारी डाव्या अंगास श्रीलंबोदरानंदस्वामी महाराजांची समाधी आहे. त्यावर एक अद्भूत सामर्थ्यवान श्रीगणेशोपासकाच्या समाधीची निश्‍चिती दर्शविणारे श्रीगणराजही अधिष्ठीत आहेत.

श्रीलंबोदरानंदस्वामी शके १७४०, सन १८१८ला सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड ग्रामी जोशी उपनामाच्या संस्कारी ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाम रामचंद्र गणेश जोशी. हे गणेशोपासक असल्याने श्रीक्षेत्र मोरगाव येथे त्यांचे जाणेयेणे असायचे. तिथे योगींद्र मठात श्रीब्रह्मानंद योगींद्रांकडून त्यांना गाणेश धर्माची दीक्षा मिळाली. विशेष म्हणजे त्यांना मोरगावात श्रीगाणेशदीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटवरून श्रीस्वामी समर्थ महाराजांनी पाठविले.

लंबोदरानंद-स्वामीनी स्थापिलेले श्रीरामसिद्धिविनायक ज्येष्ठ वद्य ४, शके १७९८, सन १८७६ या काळातीलच आहेत व श्रीगणेशोपासक म्हणून ते अतिप्रसिद्ध होते. अंकुशधारी महाराजांचा कार्यकालही या स्वामींशी जुळत नाही. कदाचित योगींद्रमठाशी संबंधित गणेशोपासक ब्रह्मानंद आणखीही कुणी असावेत. या ब्रह्मानंद स्वामींची परंपरा चढत्या क्रमाने गुरू-श्रीब्रह्मानंदस्वामी, परमगुरू-श्रीस्वयंप्रकाशानंदनाथ स्वामी, परमेष्ठी गुरू- श्रीपूर्णानंदनाथस्वामी, आदिगुरू- श्रीगणेशानंद अशी नमूद आहे. ही नावे देखील योगींद्र मठाशी संबंधित योगीराजांशी जुळत नाहीत. शिवाय, योगींद्र मठाचे अनुग्रहीत अधिकारी शिष्य नावामागे योगी अथवा योगींद्र नाव धारण करीत. त्यांपासून ही नावे भिन्नच दिसतात. मात्र योगींद्र मठाशी परंपरा ही आपली परंपरा आहे असे स्वामी सांगत, त्याअर्थी त्यांचा योगींद्रमठ वा त्या परंपरेतील अनुग्रहीत सत्पुरुषाशी संबंध असलाच पाहिजे. असो;

स्वामींचा गृहस्थाश्रम – वयाच्या बाराव्या वर्षी ते विवाहबद्ध झाले. केवळ अकरा वर्षाचे वैवाहिक आयुष्य त्यांनी उपभोगले. वयाच्या तेवीसाव्या वर्षीच त्यांची पत्नी इहलोक सोडून गेली. आईवडिलांनी दुसर्‍या विवाहाचा घाट घातला. मात्र ते तयार झाले नाहीत.

भूस्वानंद क्षेत्र मोरगाव येथे जावून त्यांनी ब्रह्मानंदस्वामींकडून गाणेशदीक्षा घेतली. त्यांचे प्रथम नामकरण गणेशानंद असे झाले. श्रीगाणेशदीक्षा घेतल्यानंतर फिरत फिरत ते अलिबागजवळ कनकेश्वरच्या पूर्व कुशीत वसलेल्या सातघर या गावी येऊन पोचले.

समाजातील तत्कालीन प्रतिष्ठीत मंडळी सेवेत आल्याने भविष्यकालातील गाणेश सांप्रदायाच्या उत्तम प्रचाराची मुहूर्तमेढच झाली होती. या मंडळींपैकी तुळजागिरी हे कनकेश्वर देवस्थानचे पंच असल्याने त्यांच्या माध्यमातून या दिव्य क्षेत्राचा परिचय झाला. यापूर्वी ते दर्शनास येवून गेले होतेच. मात्र आताची दर्शनभेट पुढील कार्याच्या संबंधाने महत्वपूर्ण ठरली. महाराजांचे यासंबंधाने उद्गार असे-‘प्रत्येक मनुष्यमात्रास एखाद्या देवतेची उपासना असतेच व तशी असणे हे इष्ट व सुखकरही आहे. त्याचप्रमाणे आमच्या गुरूपरंपरेत महागणपतीची उपासना असून श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे त्या देवतेचे मंदिर असावे, असे मनात आले आहे.’ ज्या स्थळावर श्रीमूर्ती स्थापण्याचे मनात होते, ती जागा आंग्रे सरदारांच्या शिकारीचे बैठकीचे स्थान होते. तुळजागिरीबोवांच्या मध्यस्थीने आंग्रे सरदारांना राजी करता आले. श्रीमंदिर उभारण्याची त्यांची ही इच्छा श्रीकृपेने शके १७९८, ज्येष्ठ वद्य चतुर्थीला पूर्णत्वास गेली.
बडोद्याच्या नवकोटनारायण गोपाळराव मैराळ यांचेकरवी सिद्धिबुद्धिसह श्रीगणनाथ कनकेश्‍वरी विराजमान झाले. या संबंधीचे इत्थंभूत वर्णन आपण आमच्या १२१ गणेश दर्शन ग्रंथात वाचू शकता. आता इथे फक्त समाधीविनायक तथा समाधीपुरुषाविषयी जाणून घेऊया. स्वामींचे मूळ नाम रामचंद्र असे असल्याने हे स्थान श्रीरामसिद्धिविनायक नामे जगत्कल्याणार्थ उभे राहिले.

आपले उपास्यदैवत वेदमंत्रपूर्वक प्रतिष्ठापीत झाल्यावर महाराज मूर्तिसन्निधच राहू लागले, गर्भगृहाला लागून दक्षिण दिशेला असलेल्या खोलीत ते आपली नित्यकर्मे, जपानुष्ठान पार पाडीत असत. अन्य वेळी ते समोरच्या ओटीवर बसत असत. श्रीगणेशभक्तांची दर्शनार्थ गर्दी झाली तर गर्भगृहात प्रवेश करण्याच्या द्वाराजवळ दक्षिण दिशेस बसत. काही वेळा सभामंडपामधील प्रवेशद्वाराच्या दक्षिणेला ओटीवर बसत. मंदिरात कार्यक्रम असला की यांपैकी एका जागी ते ज्या भव्य लाकडी कडीपाटावर बसत, तो मांडून त्यावर त्यांचे भव्य छायाचित्र ठेवतात.

शके १७९९, सन १८७७ मधील वैशाखात महाराजांनी पहिला जयंत्युत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला. स्वामींचे जीवनध्येय होते श्रीगणेशभक्तिचा सर्वत्र मळा फुलविणे. ते साध्य झाल्याचा अपरंपार आनंद त्यांच्या दिव्य मुखकमलावरून ओसांडून वाहत होता. श्रीगणनाथ ज्येष्ठ वद्य चतुर्थीला स्थापित झाले म्हणून तो प्रतिष्ठापना दिन. मात्र जयंत्युत्सव वैशाख पौर्णिमेला, कारण ही श्रीमूर्ती इथे पुष्टीपती विनायक म्हणूनच बसलेली आहे.

श्रीमन्मुद्गल महापुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या अध्याय ६३ व ६४ यामध्ये पुष्टीपती विनायकाचे माहात्म्य वर्णिलेले आहे. त्यामध्ये नमूद सिद्धिबुद्धिसमेत पुष्टिपती महागणपती हे स्वरूपच कनकेश्‍वरी अधिष्ठीत आहे. जनसामान्यांत श्रीरामसिद्धीविनायक हे नामाभिधान प्रचलित असले तरी हे श्रीगणनाथ पुष्टिपती आहेत. त्यानुसार या मोरयाचा व्रतकाल चैत्र पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा असा असून सत्यविनायक पूजाविधी हे याचे प्रमुख पूजाविधान आहे.
महाराजांची श्रीक्षेत्र मोरगावची परंपरा असल्याने तिथे जशी द्वारयात्रा चालते तशी द्वारयात्रा इथेही सुरू करण्यात आली.

उत्सवमूर्ती – श्रीरामसिद्धिविनायकांसमोर चार ताम्रमूर्ती आहेत. त्यांपैकी एक वीतभर उंचीचीच असून ही मूर्ती व मयूराधिष्ठित मूर्ती या दोन्ही छबिन्यामध्ये ठेवतात. मयूराधिष्ठीत मूर्ती पाळण्यात घालतात. आसनप्रभावळीसहीत असलेल्या अन्य मूर्तीची योजना उत्सवातील प्रथमदिनी व हवनाच्या प्रारंभी श्रीगणेशपूजनाकरीता आहे.

(महाराजांचा संचारकालात भगवान श्रीपरशुरामांचे दर्शन झाले. त्यांनी एक श्रीगणेशमूर्ती महाराजांना दिली होती. या मूर्तीची आता कोणीही पूजा करायची नाही, असा दंडक आहे. ती स्वत: स्वामीच पूजत असत. श्रीपरशुरामांनी ती केवळ त्यांच्या व्यक्तिगत उपासनेसाठी दिलेली होती. त्या मूर्तीस स्वतंत्ररित्या बंद ठेवण्यात येते.)

श्रीगणेशानंद तथा लंबोदरानंदस्वामींनी कनकेश्वरी श्रीमोरया प्रतिष्ठापीत केले त्याचप्रमाणे सर्व कार्य या स्थानाभोवतीच केंद्रीत न करता अन्य स्थानांच्याही स्थापना केल्या.

संन्यासदीक्षा दरम्यान एक महत्वपूर्ण घटना घडली होती. शके १८०६, सन १८८४ला ते सातघर येथे फिरत असताना एकाएकी त्यांना पोटशुळाची बाधा झाली. वयाची सहासष्ट वर्षे झाली होती. ही संन्यासदीक्षा घेण्याची वेळ आली असून श्रीरामसिद्धिविनायकांनीच सूचना केली आहे. ही संन्यासदीक्षेची ही वेळ आली आहे हे ओळखून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. श्रीमयुरेश्वर क्षेत्री येवून त्यांनी दंडग्रहण केला. खरे पाहता कागदपत्रांनुसार तरी त्या काळात योगींद्रपीठ पीठाधीशाविना रिक्त होते. त्यानंतर काही काळाने श्रीअंकुशधारी महाराजांचे पीठारोहण झाले. मग श्रीगणेशानंदाना दंड दिला कुणी? शिवाय गणेशसांप्रदायी दंड म्हणजे अंकुशधारी दंड असतो. स्वामींच्या उपलब्ध छायाचित्रात त्यांच्या हाती दिसत असलेला दंड रितसर गाणेशसांप्रदायी दंडस्वरूपातला नाही. त्यामुळे महाराज कोणत्या दंडीसंन्याशापासून दीक्षानुग्रही झाले, हे आजतरी गुपीतच वाटते. मोरगाव ही महान तपोभूमी असल्याने तिथे त्या काळात असंख्य उपासनामार्गी होते हे निश्‍चितच.

संन्यासाश्रम – संन्यासाश्रमात श्रीगणेशानंद हे श्रीलंबोदरानंदस्वामी झाले. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य लंबोदरानंद स्वामी या नामाभिधानाने ते जगविख्यात झाले. श्रीगणेशोपासनेचा धर्म त्यांनी वाढविला, गाणेशधर्माची ध्वजा उंचउंच फडफडविली. संन्यासाश्रमानंतर त्यांच्या पोटशुळाची व्याधी गुप्त झाली.

महाराजांचे प्रमुख वास्तव्य कनकेश्वरी श्रीसान्निध्यात असले तरी संन्यासदीक्षानेमाप्रमाणे एका स्थानी तीन रात्रींच्या वर मुक्काम नाही. त्यामुळे ते देवस्थान, कनकेश्वर व तेथील रहिवासी सोहोनी, सहस्त्रबुद्धे, ओक व वैशंपायन यांजकडे क्रमाक्रमाने पुडी व्हायची. नित्य आन्हीक व आत्मचिंतनासाठी ते श्रीरामसिद्धिविनायकांजवळच्या खोलीत बसत. त्यांचा कमंडलु व अन्य सर्व पात्र, उपकरणे काष्ठमय स्वरूपाची होती. देवस्थानचा कारभार, श्रीगणरायांच्या मूर्तीची उपासना आदी सर्वच गोष्टींपासून ते पूर्णत: दूर झाले. पंचमंडळ पूर्वीचे नेमले होते. त्यांनी यथास्थित सेवा चालविली. या कामी नारायण मोरेश्वर सोहोनी यांनी आपले फार मोठे योगदान दिले. उत्तम सेवा चालविली. पेणमधील बरीच गणेशोपासक मंडळीसुद्धा कनकेश्वरी सेवेकरीता येत असत.
अखेरची तीन वर्षे – देहात देवच असतो याची सर्वथैव जाणिव झाली व देहाच्या माध्यमातून देवच वावरू लागला तरी या क्रियेसाठी माध्यम झालेला जो देह व त्यातील विद्यमान जीव, त्याच्या देहप्रारब्धानुसार पूर्वजन्मातील उर्वरीत फळे भोगण्यास बांधील असतो. ती कोणासही सुटलेली नाहीत. त्यानुसार स्वामींनीही आपल्या पूर्वकर्मातील उर्वरीत फळे एकत्रितपणे भोगावयाची तयारी केली. त्यांना शके १८२१, सन १८९९ला पक्षाघाताचा झटका आला. वयाचे एक्याऐंशीवे वर्ष चालू असल्यामुळे व त्या काळातील मर्यादीत औषध उपाययोजना गृहीत धरली तर आजारपणात देहकष्ट किती पराकोटीचे असतील याची कल्पनाच नको. साधारणत: तीन वर्षे महाराजांनी या स्थितीत काढली. पूर्वसंचिताचा संपूर्ण क्षय केला. या काळात ते नित्यश: सिद्धासनात असत. या स्थितीतच त्यांनी देहत्याग करून श्रीरामसिद्धिविनायक स्वरूपात प्रविष्ट झाले. शालीवाहन शके १८२४, ज्येष्ठ वद्य सप्तमी, सन १९०२ला ते समाधिस्थ झाले. श्रीरामसिद्धिविनायकांच्या मंदिरालगतच्या जागेत जाणत्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांना विधिवत समाधी देण्यात आली. तो शास्त्रोक्त विधी बापटस्वामींनी केला. यथावकाश त्या पवित्र स्थळी समाधीवजा छोटेसे मंदिर उभारण्यात आले.

Tags :