पुण्यातील गणपतीची दहा हाताची सुरेख मूर्ती

गुरुवर्य जगोबादादा तालीम ही पुण्यातील अगदी जुन्या तालमींपैकी एक. १८३४ मध्ये या तालमीची स्थापना झाली. दगडूशेठ हलवाई हे जगोबा दादा यांचेच शिष्य. शिवाजी रस्त्यावर रामेश्वर चौकात, बुधवार पेठेतील प्रसिद्ध दत्तमंदिरानजीक या तालमीचा गणपती बसतो. 'श्रीनाथ टॉकीजच्या बाहेर' असा याचा सोपा पत्ता. पण आता श्रीनाथ टॉकीजच चालू नाही. येथे गणपतीची दहा हाताची सुरेख मूर्ती आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती करणारे प्रख्यात मूर्तिकार नागेश शिल्पी यांनी ही मूर्ती घडविलेली आहे. या संदर्भात गेली काही दशके मंडळाचे काम करणाऱ्या गोरख महांगरे यांनी माहिती दिली.

प्रभाकरशेठ वाघुलकर व दिनानाथ किरवे हे सहकारनगर येथे ध्यान करण्यास जात असत. तेथील दशभुजा गणपतीवरून मंडळाची अशी मूर्ती असावी, ही कल्पना सुचली. नागेश शिल्पींनी केलेल्या या मूर्तीअगोदर ही मंडळाची दहा हाताची मूर्ती होती, जी मूर्तिकार वाघ यांनी केली होती. १९७७ साली सध्याची मूर्ती करण्यासाठी नागेश शिल्पी यांच्या वडिलांशी संपर्क साधण्यात आला. तब्बल दोन वर्षे हे काम चालू होते. चंद्रग्रहणात दीड फूट लांबी रुंदीचे पंचधातूचे यंत्र मूर्तीच्या पोटात बसविण्यात आले. भैरोबा नाला येथे हे काम चालू होते. मूर्ती करताना कार्यकर्त्यांचाही हातभार लागत असे. त्यापैकी कोणी लघुशंकेला जरी गेले, तरी शिल्पी त्यास अंघोळ करावयास सांगत. या मूर्तीला डोळे रंगवलेले नसून काचेचे डोळे आहेत व ते बसविण्यास सहा महिने कालावधी लागला, असेही महांगरे यांनी सांगितले.

इमामभाई खान हे ३५ ते ४० वर्षे या मंडळाचे अध्यक्ष होते. ते गुलाबपाण्याने गणपतीस अंघोळ घालत. बऱ्याच कार्यकर्त्यांना गणपतीची आरती पाठ नसताना इमामभाईंना ती पाठ होती व ते स्वतः आरती करत. इमामभाई हे याच भागातील कापड व्यावसायिक. उत्सवात ते दहा दिवस रात्रभर गणपतीपाशी बसत.
- श्री. मंदार लवाटे
#PuneGaneshVisarjan2019
#puneganeshFestival2019
#Puneganeshutsav #punekar
#pune #jagobadadavastadtalimmandal
#jagobadadamandal #DagdushethHalwai
#DagdushetGanpati #puneganpati
www.puneganeshfestival.com

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture