‘जय मल्हार’ फेम रुपातल्या गणेशमूर्तीही यावेळचं वैशिष्ट्य

नेहमीपेक्षा वेगळ्या रुपातील गणेशमूर्तीसाठी भक्तांची शोधमोहीम तब्बल महिनाभर आधीच सुरू होते. यंदा झी मराठीवर सुरू असलेल्या जय मल्हार या मालिकेमुळे खंडेरायाच्या रुपातील गणेशमूर्तींना भक्तांची पसंती मिळत आहे. प्रत्येक कारखान्यात गणेशभक्त जय मल्हार रूपातील गणेश मूर्तींच्या शोधात फिरत असून, अनेकांनी ऑर्डरनुसार मूर्ती तयार करून घेतल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी आलेल्या माय फ्रेंड गणेशा चित्रपटातील गणेश आजही बच्चे कंपनीमध्ये लोकप्रिय असून, यंदाही अनेकांनी या रूपातील गणेश मूर्तींना पसंती दिल्याचे मूर्तिकार अक्षय सोनकर यांनी सांगितले. या मूर्ती १ फुटापासून ३ फुटांपर्यंत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इको फ्रेंडली गणपतींना मोठी पसंती असल्याचे मूर्तिकार सोनकर, नरेश कुंभार यांनी सांगितले.

कल्याण- डोंबिवली शहरात गणेश चतुर्थीनिमित्त ४० हजार १५० घरगुती, तर ३०२ सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जात असून यापैकी ५० टक्के भक्तांनी यंदा इको फ्रेंडली गणेशमूर्तींना प्राधान्य दिल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात या मूर्ती उपलब्ध होत नसल्यामुळे पेण आणि रोहा येथून भक्तांच्या मागणीनुसार शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती मागवाव्या लागल्या आहेत. मीनल लेले या महिला मूर्तीकारांने ई- गणेशा प्रकल्पांतर्गत ६०० इको फ्रेंडली गणेश मूर्ती उपलब्ध करून दिल्या असून, पारंपारिक बैठकीतील गणेश मूर्तीला मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

पीओपीला फाटा

घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा आपल्या मूर्तीची उंची कमी करत पीओपिला छेद देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला आहे. कल्याणातील बाल गणेश मंडळ, सहकार मित्रमंडळ यासारख्या मंडळानी यंदा इको फ्रेंडली मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला असून, मूर्तिकार नरेश कुंभार यांनी बाल गणेश मित्रमंडळाची ६ फुटांची कागदाच्या लगद्याची मूर्ती बनवली आहे. सहकार मित्रमंडळाची ४ फुटी गणेशमूर्तीसुद्धा इको फ्रेंडली आहे. ओ माय फ्रेंड गणेशा रूपातील १ ते दीड फूट उंचीच्या गणेश मूर्तींनाही मागणी कायम असल्यामुळे मूर्तिकारांनी आपल्या कारखान्यात या मूर्ती तयार ठेवल्या आहेत. अनेक कारखान्यांत मूर्तीवरून शेवटचा हात फिरवला जात आहे. डोंबिवलीतील शिवनेरी मित्रमंडळाने गेल्या ५ वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याचा वसा सुरू ठेवला असून, यंदा खिळ्यांचा गणपती डोंबिवलीतील आकर्षण ठरले आहे.

चंद्रकोरीवरून वाद

जय मल्हार मालिकेतील खंडेरायाच्या डोक्यावर चंद्रकोर आहे. मात्र गणेश चतुर्थीदिवशी चंद्रमुख पाहणे अशुभ मानले जात असल्याने हुबेहूब खंडेरायाच्या रूपातील गणेश मूर्तीबाबत अनेक ठिकाणी वाद निर्माण झाल्याने मूर्तिकारांना मूर्तीमध्ये बदल करणे भाग पडले आहे. यामुळे काही मूर्ती चंद्रकोर असलेल्या, तर काही मूर्ती चंद्रकोर नसलेल्या बनविण्यात आल्या आहेत.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture