‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

‘महाउत्सवा’ची महातयारी

दगडूशेठच्या उत्सवाचं रूप आता महाउत्सवाचं झालं आहे. आणि त्याची तयारीही तशीच असते. उत्सवाच्या काळात गाभाऱ्यातून आपल्या लाडक्या भक्तांसाठी उत्सव मंडपात येणारा दगडूशेठ हा कदाचित जगातला पहिलाच देव असावा. पुण्यातल्या गजबजलेल्या लक्ष्मी रोडवर असलेलं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे पुण्याचं आराध्य दैवत आहे. वर्षभर तिथे भाविकांची रिघ असतेच. गणेशोत्सवाच्या काळात तर गर्दीचे सर्व विक्रम मोडले जातात. त्यामुळं मंडळाकडे सर्व वर्षभरच कार्यक्रमांची रेलचेल असते. पण उत्सवाच्या या 10 दिवसांची तयारी सुरू होते ती तब्बल 5 महिने आधीपासून. मंडळाची बैठक होऊन त्यात गणेशोत्सवाचा आराखडा तयार केला जातो आणि नंतर कामांची विभागणी होते. मंडळाकडे एक हजार कार्यकर्ते असून उत्सवाच्या काळात ते दिवस-रात्र एक करतात. बाप्पांच्या प्रेमाखातर निरपेक्ष भावनेने काम करणारे कार्यकर्ते ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची खरी श्रीमंती आहे असं ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त  अशोक गोडसे अभिमानाने सांगतात.

प्राचीन मंदिरांचे भव्य देखावे हे आकर्षण

भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणं होत नाही त्या लोकांना ती मंदिंर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश आहे. यावर्षी प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारली जातेय. प्रसिद्ध कलाकार विवेक खटावर गेल्या अनेक वर्षांपासून हा देखावा साकारण्याचं काम करत असतात. ही प्रतिकृती आणि त्यावरची रोषणाई ही एवढी देखणी असते की पाहणाऱ्याला आपण प्रत्यक्ष त्या मंदिरातच आहोत असा भास होतो. गणपतीची स्थापना झाल्यावर त्याच दिवशी रात्री 7 वाजता दगडूशेठ गणपतीची रोषणाई सुरू होते. भाविक अगदी पहिल्या दिवसांपासूनच देखाव्याचा लाभ घेऊ शकतात. ज्या ऐतिहासिक मंदिराचा देखावा साकारायचा आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून मंडळाची टीम त्याचा अभ्यास करते. त्या मंदिराचे विविध अँगल्सने फोटो काढले जातात. त्याचं व्हिडीओ शुटींग करून त्यावर तज्ज्ञांची मतं घेतली जातात आणि नंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होते आणि गणेशोत्सवाच्या आधी हा देखावा पूर्ण होते. त्याच्या अचूक नियोजनाची आणि अंमलबजावणी जबाबदारी खास टीम वर दिली जाते.

शास्त्रशुद्ध पूजा आणि संपन्न परंपरेचं भान

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक गोष्टी ही शास्त्रशुद्ध आणि आपल्या संपन्न परंपरेचं भान राखूनच केली जाते. या दहा दिवसांच्या पूजेअर्चेचं खास नियोजन केलं जातं. पूजाविधीत पारंगत असणारे गुरूजी ही जबाबदारी सांभाळतात. बाप्पांच्या स्थापनेच्या वेळी पूजेचा मानही एखाद्या मान्यवरांना दिला जातो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि विजय भटकरांनाही हा मान मिळाला आहे. दगडूशेठ गणपतीच्या स्थापनेची पूजा पाहण्यासाठीही अनेक भाविक मंडपात हजेरी लावतात.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture