कल्याणकरांनी जपली ‘मेळा गणपती’ची परंपरा

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणोशेात्सवाचे स्वरूप बदलत चालले असले, तरी कल्याणातील मेळा संघाने विविध भाषा आणि प्रांताची वेस ओलांडून आपली परंपरा कायम राखली आहे.

कल्याण- लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणोशेात्सवाचे स्वरूप बदलत चालले असले, तरी कल्याणातील मेळा संघाने विविध भाषा आणि प्रांताची वेस ओलांडून आपली परंपरा कायम राखली आहे. १२ बलुतेदार समाज व्यवस्थेतील विविध ज्ञाती बांधवांचा स्वतंत्र गणपती हे मेळा संघाचे वेगळेपण आहे. मेळा संघाची अनोखी परंपरा कल्याणचे खास वैशिष्टय ठरले आहे.

कल्याण व डोंबिवली हे उत्सवप्रिय शहर म्हणूनच ओळखले जाते. कल्याणला ऐतिहासिक वारसा असून डोंबिवलीने सांस्कृतिक शहर ठसा कायम ठेवला आहे. शिव छत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या कल्याणात ‘मेळा गणेशोत्सव’ ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. कल्याणच्या सुभेदार वाडयात १८९५ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या काळी देशप्रेमाने भारलेल्या तरुणांची एवढी मोठी संख्या कल्याणात होती की, लोकमान्य टिळकांनी स्वत: सुभेदार वाडय़ात येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी कल्याण शहराची लोकसंख्या जेमतेम ८ हजार होती.

श्रीमंत प्रभाकर काशिनाथ ओक, लक्ष्मण विष्णु फडके, श्रीमंत अनंत महादेव बिवलकर, रामचंद्र जर्नादन भातखंडे, रामचंद्र केशव फडके, गोपाळ फडके आदींनी दोन उत्सव करण्याचे ठरवले. समाजातील सर्व जमातीच्या पुढा-यांना सुभेदार वाडय़ात पाचारण केले व त्यांना उत्सवाची कल्पना समजावून सांगितली. सर्वाचा विचारविनिमय झाल्यावर हा उत्सव वाणी, तेली, चांद्रसेनी कायस्थ प्रभू, खाटीक मंडळी, धनगर, पांचकळशी, गुजराथी, मराठे मंडळी वगैरे मंडळांनी प्रत्येकी आपआपल्या जमातीतर्फे हा उत्सव साजरा करायचा आणि शिवाय सर्वानी मिळून एक सार्वजनिक गणपती बसवायचा असा निर्णय एकमताने घेण्यात आला. हा उत्सव रामाजी महादेव बिवलकर यांचे सुभेदार वाडयात करायचा, असे ठरले. त्यानुसार हा उत्सव सुरू आहे. सर्व मेळ्यांचा व सार्वजनिक गणेशोत्सवाचा विषय हा कल्याणचा स्वतंत्र  इतिहासच आहे.

कल्याणच्या मेळा उत्सवाची परंपरा अनेक वर्षापासून आजतागायत सुरू आहे. ढोल-ताशांचा गजर आणि लेझीम पथकाच्या तालावर गणेशाचे स्वागत केले जाते.

पेणच्या मूर्तीप्रमाणेच कल्याणच्या मूर्तीकलेचीही वेगळी ओखळ आहे. कल्याणच्या कुंभारवाडा परिसरात दिग्गज मूर्तीकारांची फौजच आहे. रुढी परंपरा व संस्कृ तीचे जतन करणारे शहर  म्हणूनच डोंबिवलीची ओखळ आहे. डोंबिवली शहराने गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू केलेली नववर्ष स्वागत यात्रा देश विदेशात पोहोचली आहे. सर्वच सण उत्सव साजरे करण्यात डोंबिवली नेहमीच आघाडीवर असते. गणेशोत्सव मोठया थाटामाटात साजरा केला जातो. विविध देखाव्यांतून सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहचविला जातो. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेले गणेश मंदिर संस्थान हे डोंबिवलीकरांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्र मांची रेलचेल सुरू असते.

डोंबिवलीतील छोटसं गाव असलेल्या संदप गावाने जपलेली ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा प्रत्येक गावाला आदर्श ठरावी अशीच आहे. विजेचा झगमगाट आणि रोषणाईवर केली जाणारी लाखो रुपयांची उधळपट्टी यांना एक गाव एक गणपतीच्या परंपरेने ब्रेक लागला आहे.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture