६५ व्या वर्षीही जपली शाडू गणेशमूर्ती कला

२१ व्या शतकाकडे झेपावणारे अवघे जग आधुनिकतेच्या मागे धावत असतानाही तालुक्यातील वेरळ-वासेवाडी येथील गणेशमूर्तीकार शंकर सखाराम जडय़ाळ शाडू गणेशमूर्ती कला जोपासत आहेत.


खेड –२१व्या शतकाकडे झेपावणारे अवघे जग आधुनिकतेच्या मागे धावत असतानाही तालुक्यातील वेरळ-वासेवाडी येथील गणेशमूर्तीकार शंकर सखाराम जडय़ाळ यांनी वयाच्या ६५व्या वर्षीही आधुनिकतेला छेद देत पारंपरिकतेची कास धरत शाडू गणेशमूर्ती कला जोपासत आहेत. कमी वेळ.. कमी मेहनत.. कमी गुंतवणूक म्हणून वातावरणाला घातक असतानाही प्लास्टरच्या गणेशमूर्ती मूर्तीकार तयार करतात.

मात्र, जडय़ाळ यांनी मेहनत तसेच उत्पन्नाची कोणतीही तमा न बाळगता केवळ शाडूच्याच मूर्ती बनवण्याचा निश्चय करत आजही खरी कला त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या चित्रशाळेत शाडूच्या पाच फुटापर्यंत उंचीच्या २०० ते ६००० रुपयांपर्यंत गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. आजही शाडूच्या मूर्तीना मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मूर्तीकलेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता जडय़ाळ यांनी आपल्या सचिन व सुधाकर या मुलांना हाताशी धरून गेली २९ वर्षे विविध आकारातील गणेशमूर्ती साकारल्या आहेत.

१९६७ मध्ये जडय़ाळ यांनी आवड म्हणून शाडूच्या मातीपासून पहिली गणेशमूर्ती तयार केली. त्यानंतर त्यांची आवड आणखीनच दृढ होत गेली. त्यामुळे त्यांनी कलेकडे केवळ आवड म्हणून न पाहता कलेला व्यवसायाची जोड देऊन गणेशमूर्ती कारखाना सुरू केला. त्यावेळी ४० ते ५० मूर्ती बनवणारे शंकर जडय़ाळ आज ९०० गणेशमूर्ती साकारत आहेत. साधारणत: तीन महिन्यांपूर्वी आपल्या दोन मुलांसह गावातील सहा तरुणांबरोबर ते गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात करतात. त्यांच्या मूर्तीशाळेत अनेक तरुणांना गणेशोत्सवानिमित्त रोजगार उपलब्ध होतो. तसेच गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी सर्व मूर्ती स्थापनेसाठी तयार करण्यात येतात. या कामगारांमध्ये स्त्री कलाकाराचाही समावेश आहे.

दिवसागणिक वाढत्या महागाईमुळे शाडूच्या मातीसह रंगांचे दर गगनाला भिडले आहेत. अशावेळी केवळ लाभाचा विचार केला, तर खरी कला लवकरच लोप पावेल. आजचे युग हे संगणकाच्या बटणावर चालत आहे. यामुळे भविष्यात खरा हस्त कलाकार पाहावयास मिळणार नाही. मात्र, या कलेची जोपासना करणे हे माझ्यासारख्या वयोवृद्ध कलाकारचे कर्तव्यच आहे. माझ्यानंतर माझी मुलेही हीच पारंपरिक कला जोपासतील, असा आशावाद शंकर जडय़ाळ यांनी  व्यक्त केला.

 

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture