देवाचे सोनार

मोठमोठय़ा, भव्य गणेशमूर्ती हे मुंबईतल्या गणेशोत्सवाचे नेहमीच वैशिष्टय़ राहिले आहे. साहजिकच या भव्य मूर्तीना साजेसा असा त्यांचा सगळा साज असतो. त्याचाच एक भाग म्हणजे या मूर्तीचे भव्यदिव्य दागिने. २०-२२ फूट उंचीची गणेशमूर्ती असेल तर तिचा मुकुट, हार, तोडे हे दागिनेही तेवढय़ा आकाराच्या देहावर साजेसेच असायला हवेत. या दागिन्यांसाठी मुंबईत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे पाय वळतात, ते देवाचे सोनार म्हणून गणेश भक्तांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या नाना वेदक यांच्याकडे.

सराफी हा नाना वेदकांचा पिढीजात व्यवसाय. पण १९९४ साली त्यांनी मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाचा मुकुट घडवून दिला आणि तिथंपासून मंदिरातले दागिने करायला सुरुवात झाली. सिद्धिविनायकासाठी त्यांनी आजवर जवळजवळ शंभरेक मुकुट तयार केले आहेत. सिद्धिविनायकाच्या दागिन्यांबरोबरच वेगवेगळ्या मंदिरांमधल्या देवांचे दागिने करण्याचं काम त्यांच्याकडे यायला लागलं.

त्यानंतर कामाला वेगळं वळण देणारा टप्पा आयुष्यात आला तो २००६ मध्ये. या वर्षी त्यांच्याकडे सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची सोनपावलं तयार करण्याचं काम आलं. ‘तेव्हापासून मुंबईतल्या बहुतेक मोठय़ा गणपतींसाठी दागिने तयार करण्याचं काम आमच्याकडेच येत गेलं.’ नाना वेदक सांगतात. ‘लालबागचा राजा, गणेशगल्ली, गिरगावचा राजा, फोर्टचा राजा अशा मोठमोठय़ा ७० ते ८० टक्के गणपतींसाठी आम्ही दागिने तयार केले आहेत.’लालबागच्या राजासाठी त्यांनी ३० किलो चांदीची पावलं तयार केली. गणेशोत्सवाच्या काळात भक्त राजाच्या पायाशी नारळाची तोरणं वाहतात. त्याच्या पावलांवर डोकं ठेवणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात असते. सततच्या स्पर्शामुळे मातीच्या मूर्तीला इजा पोहोचण्याची शक्यता निर्माण होते. तिची नखं निघून जाऊ शकतात. लालबागच्या राजाच्या मंडळाची पूजेची मूर्तीही तीच आहे. तेव्हा पायाच्या सुरक्षेच्या दृष्टीने लालबागच्या राजाला ही सोनपावलं तयार करण्यात आली होती. मूर्तीच्या मूळच्या ढाच्याला जराही धक्का न पोहोचवता तिला पावलं जडवणं हे अतिशय नजाकतीचं, कौशल्याचं काम आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी केल्याचं नाना वेदक अभिमानाने सांगतात. ही पावलं मंडळाला आणि भक्तांना इतकी आवडली की राजाचे सगळेच दागिने करण्याचं काम त्यांच्याकडे यायला लागलं. राजाची भिकबाळी, बाजूबंद, परशू, कडे, खालच्या हाताचे कडे, कमरपट्टा, तीन कंठय़ा, सोनपावलं, पायाखालची गादी, गदा, उंदीर हे सगळं त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. त्यापैकी सोनपावलं, पायाखालची गादी आणि उंदीर चांदीचा आहे. तर बाकी सगळे दागिने सोन्याचे आहेत. सोनपावलांनंतर लगेचच लालबागच्या राजाच्या मंडळाने त्यांना ‘राजा’चा अधिकृत सोनार म्हणूनच नेमलं. आणि तिथून पुढे इतर मंडळांनीही त्यांच्याकडून आपापल्या गणेशमूर्तीसाठी सोनपावलं आणि इतरही दागिने करून घ्यायला सुरुवात केली.घरगुती गणपतीचे दागिने आणि सार्वजनिक गणेशमूर्तीचे दागिने यातला फरक नोंदवताना नाना सांगतात की मुख्य फरक आकारातला असतो. घरगुती गणेशमूर्ती आकाराने लहान असल्यामुळे तिचे दागिनेही लहान असतात. या दागिन्यांवरची कलाकुसरही नाजूक असते. घरगुती गणेशमूर्तीच्या दागिन्यांसाठी  ऑर्डरप्रमाणे मूर्ती घेऊन तिच्यावरच मुकुट, तोडे, कंठी हे दागिने तयार केले जातात. सार्वजनिक गणेशमूर्तीच्या बाबतीत असं नसतं. मुळात तिचा आकार प्रचंड असल्यामुळे तिचे दागिनेही आकाराने मोठे, वजनाला जास्त असतात. त्यासंदर्भातला एक फरक सांगताना नाना सांगतात की तीनचार अपवाद वगळता बाकी सगळी गणेश मंडळं चांदीमध्ये दागिने घडवून त्यांना सोन्याचं पाणी देतात. लालबागचा राजा, गणेशगल्ली, मुंबईचा राजा, सह्य़ाद्री सार्वजनिक मंडळ, जीएसबी वडाळा या चारपाच मंडळांनी सगळे दागिने सोन्यातले घडवले आहेत तर बाकीच्यांसाठी चांदीत दागिने घडवून सोन्याचं पाणी दिलं आहे.

आकार आणि चांदीसोनं याबरोबरच घरगुती तसंच सार्वजनिक गणेशमूर्तीसाठीच्या दागिन्यांच्या डिझाइनमध्येही फरक असतो, असं नाना सांगतात. ही डिझाइन्स प्रामुख्याने पारंपरिक असतात. ते आणि त्यांचे सहकारीच ही डिझाइन्स तयार करतात. त्यासाठी ना कागद हातात घेतला जातो, ना त्यावर काही डिझाइन्स काढून बघितली जातात. गणेशमूर्तीचा मोल्ड बघितला की या मूर्तीवर कोणत्या डिझाइनचे दागिने शोभून दिसतील हे समजतं आणि त्यानुसार नाना आणि त्यांचे सहकारी कामाला लागतात. असं असलं तरीही प्रत्येक दागिना पारंपरिक पद्धतीचा आणि पहिल्यापेक्षा वेगळा असतो असं नाना सांगतात.

एरवी घरगुती गणेशमूर्तीच्या बाबतीत मूर्तीपासून दागिन्यांपर्यंत टीव्ही-सिनेमांमधल्या ट्रेण्डनुसार दरवर्षी बदल होत असतात तसं सार्वजनिक गणेशमूर्तीच्या दागिन्यांबाबत घडत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. ट्रेण्डच सांगायचा तर सध्या गणेशमूर्तीचा आशीर्वादाचा हात आणि सोनपावलं तयार करून घेण्याचा ट्रेण्ड आहे, असं ते सांगतात. हल्ली बहुतेक गणेशमंडळं गणेशमूर्तीला चांदीमधले  हात आणि सोनपावलं जडवून घेतातच. सार्वजनिक गणेशमूर्ती अवाढव्य आकाराची असल्यामुळे हे हात आणि पावलं आकाराने तिला साजेशी असेल असं बघितलं जातं.

नानांनी २००६ पासून आत्तापर्यंत सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी चांदीत साताठशे किलोचे दागिने केले आहेत. तर सोन्यात दरवर्षी तीन ते चार किलोचे दागिने केले आहेत. ते सांगतात की कोणत्याही भव्य गणेशमूर्तीसाठी ऑर्डर आली आणि दागिने तयार करून दिले आणि त्या मूर्तीवर घातले असं होत नाही. मूर्ती तयार व्हायला सुरुवात होते तेव्हाच तिच्या दागिन्यांची तयारी सुरू होते. त्यासाठी मूर्तीचा मोल्ड त्यांना लागतो. साधारण मार्च अखेरीस मूर्तीचे मोल्ड तयार करायला सुरुवात होते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात हे मोल्ड मूर्तिकाराकडून आणून मग त्यानुसार दागिन्यांना सुरुवात होते. गणपती बसेपर्यंत हे काम अहोरात्र सुरू असते. त्यांच्या या कामातील अनुभवामुळे मुंबईतील मोठय़ा मूर्तींचे  मूर्तिकार त्यांच्या संपर्कातल्या गणेश मंडळांना गणेश मूर्तीसाठी दागिने करायचे असतील तर नानांकडेच पाठवतात.

नाना सांगतात की लालबागच्या राजाएवढय़ा मोठय़ा मूर्तीचे दागिने तयार करण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी लालबागच्या राजासाठी ३० किलो चांदीतून सोनपावलं तयार केली. त्या पावलांमुळे लोक त्यांना ओळखायला लागले, त्यांची प्रसिद्धी व्हायला लागली. त्यांच्यासाठी दागिना करण्याचा दुसरा आव्हानात्मक अनुभव होता, लालबागच्याच गणेशगल्लीच्या गणेशमूर्तीसाठीचा. २२ फूट उंचीच्या या मूर्तीसाठी सहा किलो सोन्यातून १२ फुटाची कंठी  करायची होती. सोनं हे धातू म्हणून कठीण नसतं, तर मृदू असतं. त्यामधून २२ फूट उंचीच्या मूर्तीसाठी कंठी करणं, कंठीचं सहा किलोचं वजन त्या मूर्तीने पेलणं, शिवाय एवढय़ा मोठय़ा मूर्तीवर तो दागिना घालणं, तो घालताना घ्यायची काळजी हे सगळंच आव्हानाचं होतं. पण ते त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लीलया पेललं. कंठी अजूनही त्या मूर्तीवर घातली जाते. आजही ती भारतातली सगळ्यात जास्त उंचीची, लांबीची, वजनदार कंठी आहे.

आणखी एक उल्लेख ते आवर्जून करतात की मुंबईत फोर्टमध्ये इच्छापूर्ती गणेश मंडळाने खूप हौसेने मुकुटापासून सर्व दागिने केले आहेत. खरं तर मोठी मंडळं मुकुट सहसा बनवत नाहीत. कारण तो खूप वजनदार असतो आणि असा वजनदार मुकुट मूर्तीच्या मस्तकावर घालून ठेवायचा तर खूप काळजी घ्यावी लागते. पण इच्छापूर्ती मंडळाने तो तयार केला आहे. नाना सांगतात की या मंडळाचे सगळेच दागिने खूप वैशिष्टय़पूर्ण आहेत.

शाडूच्या मातीपासून केलेली गणेशमूर्ती असेल तर दागिन्यांच्या बाबतीत खूप काटेकोरपणे विचार करावा लागतो, असा नानांचा अनुभव आहे. गिरगावचा राजा ही खूप मोठी मूर्ती शाडूची आहे. तिच्या दागिन्यांचं डिझायनिंग करताना नाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागली होती. गळ्यातली कंठी, हातातले तोडे मूर्तीच्या वजनाप्रमाणे आणि आकाराप्रमाणे करताना शाडूच्या मूर्तीवर ओरखडाही येता कामा नये, हे पहावं लागतं. अर्थात मुंबईतल्या ९० टक्के मोठय़ा मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शाडूच्या आहेत, असंही त्यांचं निरीक्षण आहे.

बहुतेक मंडळं एकदा केलेले दागिने पुढे दरवर्षी वापरतात. लोक नवस म्हणून गणपतीला सोनं वाहतात, त्यातून नवीन दागिने केले जातात. पण आधी केलेले मूळ दागिने मात्र मोडले जात नाहीत, लालबागच्या राजासाठी २००६ साली केलेली सोनपावलं, २००७ साली केलेले दागिने आजही वापरले जात आहेत. बहुतांश मंडळं तसंच करतात. त्यामुळे दरवर्षी त्याच मंडळांचे नवीन दागिने आणि नवीन मंडळांच्या गणेश मूर्तीसाठी नवे दागिने करण्याचं काम सुरू असतं.

‘देवाचे दागिने करणारा माणूस म्हणून लोक माझ्याकडे बघतात, त्यांच्या आवडत्या देवाचं रूप या दागिन्यांमुळे खुलतं याचा त्यांना आनंद होतो. त्यांच्या या आनंदातच माझाही आनंद सामावलेला आहे,’ असं या ‘देवाच्या सोनारा’चं म्हणणं आहे.

गणेशमूर्तीवरचे दागिने

गणेशमूर्तीवर मुकुट आणि प्रभावळ असते. कानात मोत्याची पेशवाई भिकबाळी असते. सोंडपट्टा हा चेहऱ्यावरचा समोरून दिसणारा दागिना असल्याने तो खुलून दिसतो. चार हातात कडय़ा, त्यापैकी खालच्या हातात परशू कडं असतं. बाजूबंद असतो. लाल खडय़ाची अंगठी असते. पारंपरिक पद्धतीची कंठी असते. सोनपावलं, कमरपट्टा, आशीर्वादाचे हात, पूर्ण कान असे दागिने गणेशमूर्तीवर असतात. त्याशिवाय सोन्याचे जानवेही काहीजण घालतात. गणेशमूर्तीसाठी चांदीचे कानही केले जातात. तेही समोरून थेट दिसत असल्याने शोभून दिसतात. त्याशिवाय सोन्याच्या दुर्वा केल्या जातात. पण त्यांच्यामुळे ओरखडे येण्याची शक्यता असल्याने त्या अंगावर घातल्या वाहिल्या जात नाहीत. दुर्वा, मोदक, जास्वंदीची फुलं, जानवं, उंदीर हे सगळं गणेशासाठी चांदीसोन्यात केलं जातं. पण त्यांची गणना अर्थातच दागिन्यांमध्ये होत नाही.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture