श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

अत्यंत साधेपणाने, कोणतीही आरास-देखावा न करता साजरा होणारा 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांच्या प्रसारात पुढाकार घेण्याआधी, 1892 सालीच स्थापन झालेला गणपती. बुधवार पेठेतील शालूकर बोळात इचलकरंजीकरांच्या तबेल्यात या गणरायाची स्थापना झाली आणि त्याच वषीर् विसर्जन मिरवणूकही निघाली. त्यामुळेच हा भारतातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती ठरतो.

भाऊसाहेब रंगारी यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. जून 1892मध्ये भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशीनाथ ऊर्फ नानासाहेब खासगीवाले हे ग्वाल्हेरला गेले असताना त्यांनी दरबारात सर्व प्रजेला सोबत घेऊन साजरा केला जाणारा गणेशोत्सव पाहिला. पुण्याला परतल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी यावर चर्चा केली. भाऊसाहेबांना कल्पना पसंत पडली आणि सार्वजनिक गणेेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महषीर् अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटवडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत सातव, दगडूशेठ हलवाई, गंगाधर रावजी या मान्यवरांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला. त्या वषीर् भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब खासगीवाले यांनी गणपती बसवले. 10 दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीला मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यानंतर 1894मध्ये लोकमान्य टिळकांनी सरदार विंचूरकर वाड्यात गणपती बसवून सार्वजनिक उत्सवामागे आपली ताकद उभी केली.

भाऊसाहेब रंगारी गणपतीची सुरुवात झाली तेव्हा गणपती राक्षसाला मारत असल्याची तीन फूट उंचीची मूतीर् कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली. आजतागायत तीच मूतीर् कायम आहे. त्यावेळी या गणपतीसमोर लोकमान्य टिळक, प्रा. शि. म. परांजपे, कृ. प्र. खाडिलकर, श्ाीधर जिन्सीवाले, सेनापती बापट, बिपीनचंद पाल, नानासाहेब दंडवते, हुतात्मा राजगुरू यांची व्याख्याने होत असत. प्रवचने आणि मेळेही भरत असत. 1900 ते 1907 या काळात गणपतीसमोर जिवंत वाघांच्या साह्याने देखावा उभा केल्याचे सांगितले जाते.

Tags :

#PuneGaneshFestival #Ganpati #PuneGanpati #श्रीमंतभाऊसाहेबरंगारीगणपती #BhausahebRangariGanpati