पुढच्या वर्षी लवकर या ! बाप्पा निघाले गावाला

दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची तितक्याच उत्साहात सांगता करण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील गणेशभक्त आज सज्ज झाले आहेत. आवडत्या बाप्पाला आज थाटामाटात मुंबई-पुण्यासह राज्यभरात निरोप देण्यात येत आहे. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त रविवारी निरोप देत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी, गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी दुपारपासून मध्य आणि दक्षिण मुंबईत लाखो भाविक गर्दी करायला सुरूवात केली आहे. दरम्यान, गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली आहे. तर पुण्यातही विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये मानाच्या गणपती पूजनानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की करण्यात आल्यीची घटना घडली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत आहेत. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं महात्मा फुले मंडईत आगमन झालं आहे. राज्यभरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि घातपाती कृत्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास पोलीस दल सज्ज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture