अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन .

अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. निमित्त होतं ते स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. त्यांची येणारी आगामी मालिका ‘जिवलगा’ ही महागणपतीच्या आशिर्वादाने यशस्वी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहचावी, असे साकडे स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी घातले. ही मालिका २२ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर स्वप्निल आणि सिद्धार्थ टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. त्यामुळे ‘जिवलगा’ ही मालिका दोघांसाठीही खुपच स्पेशल आहे. या मालिकेमध्ये या दोघांबरोबर आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही ‘जिवलगा’ मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडे सुद्धा या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

 

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture