ओटवणेतील संस्थानकालीन कुळाचा गणपती

सावंतवाडी संस्थानचे मूळ असलेल्या ओटवणे गावातील कुळाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाचे पूजन मोठय़ा भक्तिभावाने करण्यात आले.

राजेशाही संस्थानाबरोबरच गाव-हाटीतील धार्मिकतेचा वारसा लाभलेल्या या गणपतीची मूर्ती घडविण्यापासून ते विसर्जनापर्यंत विविध धार्मिक रितीरिवाज आजही परंपरेप्रमाणे जपले जातात.

गावाच्या प्रमुख मानक-यांच्या घरी विराजमान होणा-या या गणपतीला कुळाचा गणपती तसेच गावाचा गणपती असेही संबोधण्यात येते. रक्तवर्णित असणा-या या ५ ते ६ फुटी गणेशाची मूर्ती गावातील प्रसिद्ध मूर्तिकार के. अनंत मेस्त्री यांच्या शाळेत पूर्वीपासून घडविली जाते.

मातीच्या गोळय़ापासून या मूर्तीची घडवणूक झाल्यानंतर हरितालिकेच्या दिवशी रात्री १२ नंतर या मूर्तीचे रंगकाम केले जाते व सूर्योदयापूर्वी रंगकाम पूर्ण केले जाते. त्यानंतर मानक-यांच्या उपस्थितीत सूर्योदयानंतर तळी ठेऊन पूजा केली जाते व त्यानंतर मूर्तीचे नेत्र उघडले जातात.

रक्तवर्णित कुळाचा गणपती नवसाला पावणारा अशी ख्याती असल्याने गावातील भाविक या गणपतीचे आवर्जून दर्शन घेतात व आपले साकडे गणेशासमोर मांडतात.

https://www.lokmat.com/maharashtra/450-years-unbroken-tradition-gavagapatapati/

Tags :