कोकणातील अनोखी प्रथा साखर चौथीचा गणपती

भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते. गणेशमूर्तीही बाजारातील दुकानांमध्ये आपापल्या मेकअपवर फायनल टच मारून मखरात विराजमान होण्यासाठी तयार होत असतात.

घराघरात रंगरंगोटी चालू असते. घरातील आडोशाची भांडीही चमकू लागतात. चिवडा, लाडू गणपती बाप्पाच्या व पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपला खमंगपणा पणाला लावतात. थर्माकोलचे मखर, पुष्परचना, दीपमाळा घरात ट्रायल घेत असतात. नाक्यावर सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडप घालून पडद्याआड देखावे, सजावटीचे काम चालू असते. चलचित्रांची रिहर्सल चालू होते.

दीड दिवसांचा गणपती असेल तर दुसर्‍या दिवशी संध्याकाळी धामधुमीत विसर्जन केल जातं. असे ५ दिवसांचे, १० दिवसांचे, २१ दिवसांचे गणपती असतात. अनंतचतुर्दशीपर्यंत सर्व गणपतींचे विसर्जन झाले की घरातील माणसे जड अंत:करणाने सुन्या असलेल्या मखराजवळ येउन आरती करतात. मग सगळंच उदास होउन जात. अगदी सगळी घरं, बाजारपेठा, दुकाने, रस्ते, गल्ली सगळेच.... एक मलूल वातावरण होतं आणि ते पूर्ववत व्हायला काही दिवस जातात.

अहं... पण कोकणात, विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये मात्र इतक्या लवकर संपत नाही हा उत्सव!

 गणपतींचं विसर्जन झाल की चाहुल लागते ती भाद्रपदातल्याच संकष्टीची - म्हणजेच साखरचौथीची. पुन्हा नव्याने तेच वातावरण अनुभवण्याची.

साखरचौथीच्या गणपतीची प्रथा वर्षानुवर्षे, परंपरांगत चालत आली आहे. या प्रथेकरता काही लिखित आधार मिळत नाही किंवा कोणती पौराणिक कथा आढळून येत नाही. पितृपक्ष जरी असला तरी गणेश हा गणनायक असल्याने स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही.

ही प्रथा कोकणातच प्रचलित आहे. कोकणात गणपती मुख्य कुटुंबात एकच बसवला जातो. कुटुंबातील मूळ गणपतीची सेवा मुख्य कुटुंबाला करावी लागते. अशा कुटुंबातील भक्त श्रद्धेने गणेशाकडे काही नवस करतात आणि त्याची पूर्तता झाली की भाद्रपदातल्या संकष्टी चतुर्थी म्हणजेच साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. नवसाचे हे गणपती तीन वर्षे आणेन, पाच वर्षे आणेन असे नवस बोलले जातात पण ज्यांना ह्यांचा सहवास कायम हवा असतो ते कायम म्हणजे दर साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. ह्यातही दीड दिवस, पाच दिवस, २१ दिवस असे गणपती आणले जातात.

तुम्हाला प्रश्न पड्ला आसेल साखरचौथ म्हणजे काय?त्याचे उत्तर असे,
गणपती उंदरावरुन घसरून पडतो तेव्हा चंद्र हसतो, ह्या गोष्टीचा राग आल्याने गणपती चंद्राला शाप देतो की गणेश चतुर्थी ला कोणीही तुझे तोंड पाहणार नाही.
मग चंद्र गणपतिकडे उःशाप मागतो.
त्यावर गणपती चंद्राला सांगतो की अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टी ला तुझे पुजन होईल.संकष्टी चतुर्थी ला स्थापना करतात आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करतात. दिड दिवसाचा गणपती असतो. मुख्यतः रायगड जिल्हा मध्ये हि संकष्टी मोठ्या स्वरूपात साजरी करतात.ह्या दिवशी फळा-फुलांची आरास करुन उकडिच्या दिव्याने चंद्राला ओवाळले जाते.

ह्या स्थापनेमागचा दुसरा उद्देश म्हणजे हल्ली विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. त्यामुळे काही हौशी भक्त मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे आपल्याही घरात गणपती यावा, आपल्या घरातील वातावरण पवित्र व्हावं ह्या उद्देशाने साखरचौथीच्या दिवशी आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात.

अजून एक प्रथा म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही सुयेर किंवा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथीच्या दिवशी ते गणेशभक्त गणपतीची स्थापना करतात. हल्ली तर सणांची हौस म्हणून साखरचौथीचा सार्वजनीक गणपतीही आणला जातो. हा देखील ५ दिवस, १० दिवस अथवा २१ दिवसांचा ठेवला जातो.

साखरचौथीच्या गणपतीच्या स्थापनेचा विधी गणेश चतुर्थीच्या विधी सारखाच केला जातो. फक्त गणपती बापाचे आवडते मोदक हे साखरेच्या पुरणाचे केले जातात. उंदीरमामाच्या मोदकांची कावड साखर भरुन केली जाते.

गणेशचतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी चंद्र पाहिला जात नाही. काही जण तर चंद्र पहायचा नाही म्हणून घरातूनही बाहेर पडत नाहीत पण साखरचौथीला मात्र पुराण कथेत गणपतीने चंद्राला जो उ:शाप दिला होता तो पाळावा लागतो. त्यामुळे चंद्रोदय झाल्याशिवाय, चंद्राचे तोंड पाहिल्या शिवाय गणपती बाप्पाला नैवैद्य दाखविला जात नाही. आधी चंद्राची पूजा केली जाते. आरती करताना ती ताटात, ताम्हणात नसून मोठ्या परातीत केली जाते. साखरेचे मोदक, ५ दिवे, काकड्यांच्या जाड्या गोल चकत्या करुन एक आख्ख केळं, जिबिडाच्या ५ फोडी, एखाद फळ असे ठेवून काकडी व केळ्यात झेंडूची देठासकट फुले तुर्‍याप्रमाणे किंवा नारळाच्या झावळीच्या पातीची काड्यांमध्ये पाच फुले लावतात. ताटात नागदौण्याची फुले (कळलावी) ठेवतात. सजवण्यासाठी अजुन फुले लावतात. केळ्यावरच अगरबत्ती लावली जाते व या ताटाची आरती प्रथम चंद्राला ओवाळून मग गणपतीबाप्पाची आरती केली जाते.

साखरचौथीचे व्रतासाठी महत्व असते. जे भक्त ११ संकष्टी, २१ संकष्टीचे व्रत करतात त्यांच्या व्रताची सांगता साखरचौथीच्या दिवशी केली जाते. मग ह्या दिवशी साखरेच्या मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा खडा ठेवून केला जातो. उपास करणार्‍याने त्या दिवशी हे मोदक खाऊन उपास सोडायचा असतो. एक एक मोदक खाताना, मीठाचा खडा असलेला मोदक आला की जेवण बंद करायचे. पहिलाच मोदक मीठाचा आला तर मग तेवढाच खायचा. या उलट शेवटपर्यंत मीठाचा मोदक आला नाही तर? बापरे......

आमचा दीड दिवसाचा गणपती असतो. दुपार पर्यंत भरपूर पाहुण्यांची रेलचेल असते. संध्याकाळी बाप्पा निघायची लगबग सुरू होते. एक वेगळंच शांत वातावरण तेव्हा घरात पसरतं. लेक सासरी जाते तेव्हा जशी संमिश्र भावना मनात दाटते तशीच काहीशी. घरातून अगदी दारकशीबाहेर आणून बाप्पाची पाठवणी करताना आरती केली जाते. आणि मग 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' हे आग्रहाचे निमंत्रण बाप्पांना निघतानाच केले जाते. हाच जयघोष पूर्ण रस्ताभर चालू असतो. शेजारचे, त्या परिसरात असलेले गणपतीबाप्पा एकमेकांची वाट पाहत थांबलेले असतात निघण्यासाठी सगळे सोबतच निघतात. आमच्या इथे गणेशजयंतीच्या गणपती विसर्जना एवढीच गर्दी ह्या साखरचौथीच्या बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी होते. वाट काढत रांगेत बाप्पा आपल्या भक्तांसोबत निघतात. विसर्जन स्थळी पोहोचल्यावर पुन्हा आरती करुन बाप्पाचे विसर्जन केले जाते. बाप्पांचे पाण्यात पूर्णपणे विसर्जन होईपर्यंत पाणीभरल्या डोळ्याने भक्त त्यांना निरोप देतात आणि पुढच्या वर्षीच्या त्यांच्या आगमनाची वाट पाहतात.

Tags :