लोककलेतील- दशावतारातील गणपती

 

 

भारतात वेगवेगळ्या प्रातांमध्ये मुखवटे धारण करुन नाटक करण्याची प्रथा आजही प्रचलीत आहे. महाराष्ट्रात कोकण आणि गोव्यात दशावतारी खेळ करण्याची प्रथा आजही सुरू आहे. हा नाट्यप्रकार इ. स. १७२८ साली श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून कोकणात आणला असे मानले जाते. परंतू रामदासस्वामींच्या दासबोधात दशावताराचा उल्लेख सापडतो. दशावतार हे विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित असलेले नाट्य आहे. साधारणत: चैत्र महिन्यात याचे खेळ केले जातात.

गणेश पुराणातल्या वेगवेगळ्या कथा दशावतारात सादर केल्या जातात. मात्र, रावणकन्या शुभदा आणि गणेश यांच्या विवाहाच्या फारशा परिचित नसलेल्या कथेचं आख्यान कोकणात प्रसिद्ध आहे आणि गणपतीच्या दिवसांत ते दशावतारातून लावलं जातं, त्याची ओळख...

लोकनाटकं व लोककला यांचा उगम पुराणातून झाला तरी अलिखित अशा संहिता असलेल्या या लोककला प्रकारांत काही उपाकथानके इतकी वेगळी आहेत की, या परीकथा तर नव्हेत ना, असा भास होतो. म्हणूनच यक्षगानातलं ‘लंकिणीमोक्ष’ सारखं नाटक आपल्याला देहभान विसरायला लावतं. ‌‘जांभूळआख्यान’सारख्या नाटकातून द्रौपदीच्या अंतर्मनाचा थांग लागतो. ‘नास‌िकेत जन्म’ या दशावतारी आख्यानातून नाकातून गर्भधारणा होण्याची घटना आपल्याला आश्चर्याचा धक्का देते. ‘सुधा खङ्गासूर’ कथानकात मारुतीच्या शेपटीबरोबर सुधेचं लग्न लागतं. आता गणेशचतुर्थीचा उत्सव सर्वत्र सुरू झाला आहे. गणेशपुराणातील कथा आमजनतेला माहीत आहेत पण गणेशाच्या, त्याच्या जन्माच्या, त्याने असुरांशी केलेल्या युद्धाच्या अनेक अपरिचित अशा कथा दशावतारात आजही प्रचलित आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांचे खेळ खेळले जातात. अशा अपरिचित कथेतलीच एक कथा म्हणजे ‘अंगारिका व्रतमहिमा.’

लोककथेच्या आधारानुसार रावण हा ब्राह्मणकुळातला होता. तो शंकराचा भक्त होता. दानवप्रवृत्ती असली तरी तो गळ्यात ब्राह्मणासारखं यज्ञोपवीत घालत होता. भगवान शंकराच्या आशीर्वादामुळे त्याला दहा हत्तींचं बळ प्राप्त झालं होतं. दशावतारी नाटकात रावण त्याला स्वतःच्या ताकदीचा गर्व असल्यामुळे देवेन्द्राला त्याचं आसन प्राप्त करण्यासाठी थेट आव्हान देतो. देवेन्द्राचा पराभव करून तो सर्व देवांना ‘सळो की पळो’ करून सोडतो. त्याचवेळी नारद देवतांना ‘गणेशाला रावणाचा पराभव करण्यासाठी पाठवा’ असा सल्ला देतो. गुराख्याच्या वेषात रावणाकडे गणपती येतो. तेव्हाचे गणपती आणि रावणातले संवाद विनोदी रंगमंचीय शैलीत असतात. ते कोणी लिहिलेले नसतात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी तसे हे संवाद पात्रांच्या मुखावाटे सहज बाहेर पडतात. उदाहरणार्थ रावण गुराखी वेषातल्या गणपतीला विचारतो, कोण रे तू? ‘कोण रे!’ मधला ‘रे’ या शब्दाचा सूर एखाद्या मालवणी माणसाने आपल्या घरगड्याला विचारल्यासारखा. गणपती म्हणतो, ‘मी एक निराधार आहे.’ रावण : ‘तू रे कसला निराधार? आणि कोणता रे हवाय तुला आधार?’ गणपती : ना घर ना दार अशी माझी परिस्थिती आहे. रावण :‍ बरं आहे रे बरं आहे. तुला चोरांची भीती नाही. कारण उघडं दार असलेल्या घरात कोण चोरीच करत नाही.’ गणपती : तसं नव्हे महाराज. मी निर्धन आहे. रावण : अरे निर्धन आहेस तेच बरं आहे. कारण ज्याचे जवळ धन नाही त्याला सुखाची झोप येते. गणपती : महाराज मी आपल्याकडे नोकरी मागण्यासाठी आलो आहे. रावण : अरे मीच इथे लंकेच्या जनतेचा चाकर आहे. एक चाकर दुसऱ्या माणसाला कशी चाकरी देणार? गणपती : पण लोक म्हणतात लंकाधीश रावण उदार मनाचे आहेत. रावण : खरंच असं लोक म्हणतात? अरे बस बस. माझ्या आसनाजवळ बैस. ‌ रावण आणि गुराख्याच्या वेषातील गणपतीची भूमिका करणारे नट जेवढे हजरजबाबी असतील तेवढं हंशे निर्माण होण्याचं प्रमाण वाढणार. रावण त्याला त्याचं नाव विचारतो तेव्हा गणपती म्हणतो, ‘कुणी मला विघ्नकर्ता म्हणतात’. रावण : तू विघ्ने निर्माण करतोस? गणपती : जो लोकांना त्रास देतो त्याच्यापुढे मी विघ्ने निर्माण करतो. कुणी मला बाप्पा म्हणतात. रावण : तू आणि बाप्पा? वा रे अप्पा! नंतर गणपती एकापुढे एक अशी आपली नावं गणपती घेतो, मालवणी विनोद होतात. पण रावणाला शेवटपर्यंत हा गुराखी वेशातील गणपती आहे हे कळत नाही. तो रावणाला म्हणतो, मी ज्याच्याकडे नोकरी केली तिकडे टिकलो नाही. रावण : तू कुणाकडे टिकला नाहीस, मग माझ्याकडे टिकशील. साधारण किती महिने तू नोकरी केलीस? गणपती : जास्तीत जास्त ४८ दिवस. कुठे २१ दिवस. काही ठिकाणी ११ दिवस, कुठे सात दिवस, कुठे पाच दिवस. ज्यांना मी जास्त दिवस चाकरी केलेली आवडत नाही असे लोक मला दीड दिवसात पोहोचवतात.

मग रावण तुला पगार काय देऊ असं विचारतो तेव्हा गणपती एकवेळचं जेवण दे आणि जेवण म्हणून २१ मोदक दिवसाकाठी दे, असं सांगतो. ह्या बोलीवर रावणाची खिल्लारं राखायच्या नोकरीवर लागलेल्या ह्या गुराख्याला जेवण पोचवायला एक दिवस रावणाची कन्या शुभदा येते आणि गुराख्याच्या वेषातल्या गणपतीच्या प्रेमात रंगून जाते. शुभदा ही कन्या रावणाची मानसकन्या आहे. रावण रोज स्नान झाल्यावर शंकराला सहस्त्र रक्तवर्णी कमळे वहातो. एकदा कमळं जमा करताना एका कमळाच्या कळीमध्ये रावणाला ही कन्या मिळते. तिचं नाव तो शुभदा असे ठेवतो. शुभदा पार्वतीची भक्त असते. पार्वतीच्या मांडीवर बसलेला बालगणपती ती लहान वयात पहाते आणि असा पती आपल्याला मिळावा अशी मनोकामना करते. इकडे आपल्या शक्तीचा गर्व झालेला रावण, माझ्या ताकदीचा योद्धा माझे कंडूशमन करण्यासाठी मिळावा, असा वर भगवान शंकराकडे मागतो. ‘योग्य वेळ आल्यावर असा योद्धा तुला मिळेल’! असा आशीर्वाद भगवान शंकर रावणास देतात.

नारद रावणाकडे कळ लावतो. तुझी मुलगी तुझ्या गुराख्याच्या प्रेमात पडली आहे असे सांगतो. रावण आपल्या कन्येचा व गुराख्याचा प्रणयप्रसंग एका झाडाआड लपून स्वतःच्या डोळ्याने पहातो. त्याचं आणि गुराख्याचं मल्लयुद्ध होतं. रावणाला भूमीवर पाडून गणपती रावणाच्या पोटावर बसतो. अशा प्रकारे शंकराचं वरदान मिळाल्याची प्रचिती रावणाला येते. रावणाला गणपतीच्या रूपात तुल्यबळ योद्धा मिळतो. तो शुभदेचा विवाह गणपतीशी लावून देतो. हा विवाह होतो त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते. या दिवशी गणपतीने शुभदेला अंगिकारलं, म्हणून त्या संकष्टीला अंगारिका चतुर्थी असं म्हणायचा प्रघात पडला.
असं हे आख्यान लोकांना वेगळं वाटतं आणि रंजकही ठरतं. ग्रामजीवनातल्या लोकव्यवहारात पापपुण्याचे संकेत मानण्याचे प्रकार आहेत. परंतु त्यात जग सुंदर ठेवण्याचे लोकव्यवहारही जपलेले असतात. म्हणूनच शुक्राचार्याच्या रूपाने मद्यपान शरीरास घातक आहे, युधिष्ठाराच्या रूपाने द्युत, जुगार खेळणं टाळावं, जालंधरवृंदा आख्यानात तुळशी विवाहाच्या निमित्ताने चिंच, आवळे, तुळस, आंबा इ. वनस्पतींचं रक्षण करावं जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असे संकेत आपल्याला त्या त्या दशावतारी आख्यानातून मिळतात. मत्स्यावतार म्हणजे जलचर, नंतर कासव म्हणजे उभयचर, पुढे वराह म्हणजे वनचर, नरहर म्हणजे अर्धा प्राणी व अर्धा माणूस अशी आदिम अवस्था, अशा डार्विनच्या उत्क्रातिवादाशी साधर्म्य दाखवणाऱ्या अवस्था दशावतारात दाखवल्या आहेत. महानायक असलेल्या महागणपतीचं शीर हत्तीचं आणि देह मानवी शरीरासारखा, असा हा बुद्धी आणि सामर्थ्य यांचा सुयोग्य संगम असलेला महानायक आहे, हेही दशावतारात सादर होणाऱ्या पौराणिक आख्यानातून सांगितलेलं आहे. देशाच्या वेगवेगळया भागात होणाऱ्या तिथल्या मातीतल्या लोककलांतून अशी अनेक जीवनतत्त्वं सांगितलेली आहेत. या लोककलांच्या अंतरंगात शिरून खरा लोकधर्म काय होता, हे आपण पुन्हा तपासायला हवं. आज गणरायाचा उत्सव साजरा करताना नव्या युगाला, नव्या अध्यात्माला सामोरं जाण्याचं मनोबळ जागृत ठेवायला हवं. तरच कृषी संस्कृतीचं, सामुद्री संस्कृतीचं, पर्वत रक्षणाचं व क्षेत्रपालनाचं युग पुन्हा अवतरित होईल.

 

 

Tags :