आगळे रुप : चार टन उसापासून नाशकात साकारले बाप्पा

नाशिक जिल्हा जसा कांदा, द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे, तसा ऊसासाठीही ओळखला जातो. येथील निफाड, दिंडोरीसारख्या तालुक्यांमध्ये ऊसाचे हजारो हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. यामुळे ऊसापासूनच यावर्षी गणरायांची मुर्ती साकारायची आणि बळीराजाचे महत्त्व पुन्हा समाजापुढे अधोरेखित करायचे या उद्देशाने इको फ्रेण्डली संकल्पनेतून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ऊसाचा वापर करत ‘श्रीं’चे रुप साकारले.

            ढोल-ताशांचा घुमणारा आवाज...देखाव्यांच्या माध्यमातून जनप्रबोधनाची पर्वणी...गणेशभक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक पौराणिक पुण्यनगरी-कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील पंचवटी हा परिसर प्रभू रामचंद्रांचा वनवासकाळात महत्त्वाचा राहिला आहे. पंचवटीमधील पाथरवट लेन येथील लक्ष्मी छाया मित्र मंडळाने सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘युनिक-इको फ्रेण्डली’ गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे. मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी सुमारे चार टन   ऊसाचा वापर करुन लाडक्या बाप्पांचे आकर्षक रुप साकारले आहे.

नाशिक जिल्हा जसा कांदा, द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे, तसा ऊसासाठीही ओळखला जातो. येथील निफाड, दिंडोरीसारख्या तालुक्यांमध्ये ऊसाचे हजारो हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. यामुळे ऊसापासूनच यावर्षी गणरायांची मुर्ती साकारायची आणि बळीराजाचे महत्त्व पुन्हा समाजापुढे अधोरेखित करायचे या उद्देशाने इको फ्रेण्डली संकल्पनेतून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ऊसाचा वापर करत ‘श्रीं’चे रुप साकारले.
‘जरा हटके’ आगळीवेगळी संकल्पना व तीदेखील पर्यावरणपुरकच असेल याचा वर्षभर विचार करत त्या संकल्पनेतून भन्नाट शक्कल लढवित या मंडळाचे कार्यकर्ते गेल्या २००४ सालापासून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होत असतात. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला विविध संस्था, संघटनांकडून बक्षिसेही मिळाली आहेत. एकूणच गणेशोत्सवात शहरातील मुख्य आकर्षण पंचवटी भागातील या मंडळाचा गणपती असतो. मागील वर्षी या मंडळाने चक्क पाच हजार चिंचोक्यांपासून गणरायांची सुबकमुर्ती साकारली होती. पर्यावरणपुरक गणरायाचे रुप साकारल्यानंतर दरवर्षी त्याचे विसर्जन मंडळाकडून केले जात नाही तर ज्या गणेशभक्तांना ते रुपडे भावले त्यांना ते दिले जाते. मंडळाचे अनुप महाजन, रोशन झेंडे, अक्षय झेंडे, अभिजीत वाघ, हरी घोडके, अविनाश वानखेडकर आदि कार्यकर्ते असा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतात. एकापेक्षा एक सरस संकल्पनांच्या माध्यमातून दरवर्षी या मंडळाकडून नाविन्यपूर्ण कलाकृ तींचा शोध घेत लाडक्या बाप्पांचे आगळेवेगळे रुप नाशिककरांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला जातो.

Tags :

ganpati, pune ganesh festival, maharashtra, shivaji, culture