वैनायकी अर्थात स्त्री गणपती

वैनायकी अर्थात स्त्री गणपती.

वैनायकी या शिल्पाचा उदय नक्की कितव्या शतकात झाला याचा काही ठोस अंदाज बांधता येत नाही. याचा शोध घ्यायचा असल्यास प्रथम गणपती कधी उदयास आला हे पाहावे लागते. भारतात विघ्नांचा नाश करून मांगल्याची स्थापना करणारा देव म्हणून गणपतीला आपण सर्वजण मानतो त्याची पूजा करतो. कोणतेही धार्मिक कार्य करताना सर्वप्रथम त्याची आराधना करतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ही गणपतीची ‘प्रथम तुला वंदितो’ मान्यता ही अगदी पूर्वीच्या काळात नव्हती. याचे कारण म्हणजे वेदांची, उपनिशदांची, स्मृतींची सुरुवात गणेश स्तवनाने होत नाही. इतकेच काय तर रामायण महाभारत हे ग्रंथ सुद्धा गणेश वंदनाने सुरु होत नाहीत. पुढे कालांतराने गणेशाचे महत्त्व हळू हळू वाढत गेले. नंतर मग गणेश पुराण, मुद्गलपुराण इत्यादी फक्त गणपतीकरिता असलेली पुराणे तैय्यार झाली. गाणपत्य सांप्रदाय उदयास आला. गणपतीचा पुराणात उल्लेख जरी मिळत असला तरी मूर्ती स्वरूपात यायला त्याला बराच कालावधी गेला. पण जेव्हा मुर्तीस्वरूपात आला त्यानंतर लगेचच त्याचे शक्तीरूप आले असावे असा कयास वाटतो.

गणपतीचे संपूर्ण भारतात अस्तित्व बघायला मिळत असले तरी गणपतीचे पूजन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. विघ्नांचा नाश करणारा, भक्तांचे रक्षण करणारा, मंगलमय वातावरणाची निर्मिती करणारा देव म्हणून गणपतीकडे बघितले जाते. विघ्नकर्ता असणारा गणपती पूजा केल्यास विघ्नहर्ता होतो. गणपतीच्या मूर्तीकडे बघताना सुटलेले पोट, हत्तीची सोंड, मोदक, भव्य गंडस्थल, आखूड मांड्या या गोष्टींकडे लक्ष वेधले जाते. हिंदू दैवतांमध्ये ह्याचे आगमन उशिरा झाले असले तरी फार कमी कालावधीत हिंदू धर्मातील मुख्य देवता होण्याचा मान गणपतीने मिळवला आहे. प्रत्येक शुभकार्य हे गणपतीच्या पूजेशिवाय अशक्य आहे. शैव, वैष्णव, शाक्त पंथाप्रमाणे गणपतीला पुजणारा गाणपत्य पंथ उदयाला आला. फक्त गणपती करिता “गणेशपुराण” आणि “मुद्गलपुराण” अशा दोन उपपुराणांची निर्मिती झाली. हिंदू धर्माबरोबर गणपतीचे अस्तित्व बौद्ध आणि जैन धर्मातसुद्धा दिसून येते. अनेक आशियाई देशांमध्ये गणेश देवतेचा प्रसार झाला आहे. दक्षिणेकडील राज्यात गणपती ब्रम्हचारी असतो, तर महाराष्ट्रात रिद्धीसिद्धी त्याच्या दोन पत्नी आहेत.

हिंदू धर्मात शक्ती संकल्पनेचा उदय झाल्यानंतर प्रत्येक देवतेची शक्ती म्हणून देवतांना स्त्रीरुपात दाखवण्यास सुरुवात झाली. उदा. ब्रह्मा-ब्रह्माणी, विष्णु-वैष्णवी, महेश्वर-माहेश्वरी इ. मध्यकाळात मुख्य देवता म्हणून विनायकाची पूजा सुरु झाली आणि लवकरच विनायकाची शक्ती म्हणून वैनायकीची सर्वत्र पूजा होऊ लागली. एच. डी. भट्टाचार्य यांच्या मते मुख्य देवता म्हणून गणेशाचे पूजन होऊ लागले, त्याचवेळी गणेशाची शक्ती म्हणू गणेशानी हिचे पूजन होण्यास सुरुवात झाली असावी. विनायकी, विघ्नेश्वरी, गणेशानी, गणेस्वरी, गजानना, गणपतीहृदया इ. वैनायकीची काही नावे आहेत.

सहाव्या शतकातील वराहमिहिरलिखित “बृहदसंहिता” ग्रंथात मातृकांच्या मूर्तीविषयी खालील श्लोक आहे.

मातृगण: कर्तव्य: स्वनामदेवानुरूपकृतचिन्ह:|
रेवन्तोश्वारूढो मृगयाक्रीडादिपरिवार॥
(बृहतसंहिता, अध्याय ५७, श्लोक ५६)

श्लोकानुसार मातृका ज्या देवाच्या आहेत, त्या देवाचे रूप ध्यानात ठेवून बनवल्या पाहिजेत. यात कुठेही मातृकांच्या नावाचा उल्लेख नाही आहे. श्लोकातील पहिला ओळ मातृकांविषयी, तर दुसरी ओळ सूर्यपुत्र रेवंतविषयी आहे. उत्पल (९वे-१०वे शतक) यांनी बृहदसंहितेवर टीकात्मक ग्रंथ लिहिला. उत्पल यांनी बृहतसंहितेतील मातृकांच्या श्लोकावर टिका करताना मातृकांना ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐन्द्री, यामी, वारुणी, कौबेरी ही नावे दिलेली आहेत. त्याचबरोबर नारसिंही, वाराही आणि वैनायकी या इतर मातृका आहेत असे सांगितले आहे.

सोळाव्या शतकात केरळ येथील श्रीकुमार यांनी देवतांच्या मूर्तीविषयी “शिल्परत्न” हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात शक्ती-गणपतीचे वर्णन करणारा पुढील श्लोक आहे.

द्वाभ्यां विभ्राजमानं द्रुतकनकमहाशृङ्खलाभ्यां कराभ्यां
बीजापूरादिशुम्भद्दशभुजललितं पञ्चबीजस्वरूपम् |
सन्ध्यासिन्दूरवर्णं स्तनभरनमितं तुन्दिलं सन्नितम्बं
कण्ठादूर्ध्वं करीन्द्रं युवतिमयमधो (तं?) नौमि देवं गणेशम् ॥
(शिल्परत्न – उत्तरार्ध, अध्याय २५, श्लोक ७४)

सारांश: त्याचा कंठाखालचा भाग युवतीसारखा आणि कंठावरचा भाग हत्तीसारखा आहे. शेंदुरासारखा लाल वर्ण आणि स्तनामुळे झुकलेला तुंदिलतनू असा तो शक्तीगणपती आहे.

पुराणातील वैनायकीचे संदर्भ

स्कंदपुराणाच्या काशीखंडात (४५वे प्रकरण) व्यासऋषी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्कंदऋषी चौसष्ट योगिनींची नावे सांगतात आणि त्यातील पहिले नाव गजानना आहे. मत्स्यपुराणामध्ये २०० स्त्रीदेवतांचा उल्लेख आहे आणि वैनायकी त्यापैकी एक नाव आहे. परंतु अग्नीपुराणात उल्लेखलेल्या योगिनींच्या नावामध्ये गजानना किंवा वैनायकी नावाचा उल्लेख नाही आहे. देवी-सहस्त्रनाम ग्रंथात देवीच्या एक हजार नावांचा उल्लेख केला आहे. त्यात विनायकी, लंबोदरी आणि गणेश्वरी ह्या तीन नावांचा उल्लेख आला आहे. विष्णुधर्मोत्तरपुराण आणि मत्स्यपुराणातील कथेनुसार भगवान शंकरांनी अंधकासुराचा वध करताना, त्याचे रक्त जमिनीवर पडल्यानंतर नवीन अंधकासुराची निर्मिती होऊ नये म्हणून युद्धात त्याच्या पडलेल्या प्रत्येक रक्ताचा थेंब भक्षण करण्यासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यापैकी एक मातृका म्हणजे वैनायकी. लिंगपुराणात विनायकीचा उल्लेख आलेला आहे.

जैन आणि बौद्ध धर्मातील वैनायकीचे स्वरूप

जैन धर्मात वैनायकीची योगिनी म्हणून उपासना केली जात होती. बडोदा येथील जैन मंदिररातील हंस विजय संग्रहात “चतुष्षष्टियोगिनी” (हस्तलिखित क्र. ३९६) हस्तलिखितात महायोगी, सिध्दीयोगी, प्रेताक्षी, डाकिनी आणि इतर योगिनींच्या नावाबरोबर गणेश्वरी हे नाव आलेले आहे.

बौध्दधर्माच्या वज्रयान पंथात वैनायकीला गणपतीहृदया नावाने ओळखले जाते. अमृतानंदलिखित “धर्मकोशसंग्रह” ग्रंथात गणपतीहृदया या देवीचे वर्णन नृत्यस्थिती, एकमुख, द्विभुज, एक हात वरदमुद्रेत आणि दुसरा हात अभयमुद्रेत असे करण्यात आले आहे. जैन आणि बौद्ध धर्मानी वैनायकीला आपल्या देवतांमध्ये समाविष्ट केले याच्यावरून तिचे महत्त्व दिसून येते.

सप्तमातृका आणि गणेश

वैनायकी आणि इतर मातृकांची निर्मिती शंकराने केली, म्हणून मातृकांना गणेशाची माता असे मानले जाते आणि म्हणूनच सप्तमातृकापटांमध्ये गणपती दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक हिंदू लेण्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये सप्तमातृकापट दिसून येतात. परंतु, पाटेश्वर लेण्यातील मातृकापटात गणपतीला स्थान देण्यात आलेले नाही. “सुप्रभेद आगम” ग्रंथात सप्तमातृकांबरोबर गणेश दाखवावा असे लिहून ठेवले आहे. सुप्रभेदागमनुसार सप्तमातृका/अष्टमातृका शिल्पपटात पूर्वेला वीरभद्र आणि पश्चिमेला गणपतीची मूर्ती असते. मातृकापटात उजव्या बाजूला पहिला गणपती आणि वीरभद्र (भैरव) डाव्या बाजूला सर्वात शेवटी असला पाहिजे असे भुवनदेव लिखित अपराजित पृच्छा या ग्रंथात नमूद केले आहे.

चतुर्भुजास्तु सर्वाश्च नलिनास्ताश्च संस्थिता: |
वीरभद्रन्तु पूर्वे तु विघ्नेशं पश्चिमं दिशि ॥
(सुप्रभेद आगम – मातृस्थानविधिपटल, ४२-६)

 

मातृणां च ततो वक्ष्ये भैरवादिगणांस्तथा |
वीरेशं कारयेव्दत्स वीणाहस्तं सनर्त्तनम् ॥
गणनाथं तत: कुर्यात् गजवक्त्रं महोत्कटम्
आदौ तु गणनाथं च ह्यन्ते कुर्यात्तु भैरवम् ॥
(अपराजित पृच्छा – २२३, १२-१३)

वैनायकीची लघुचित्रे

काही मोजक्या लघुचित्रांमधून (Miniature Paintings) पण आपल्याला वैनायकीचे दर्शन होते. नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय संग्रहालयात १८व्या शतकातील चंबा शैलीतील लघुचित्र आहे. ह्या चित्रात नटेश (शंकर) तांडव नृत्य करत असून त्याच्या शेजारी विनायक, कार्तिकेय आणि गण दाखवले आहेत. ह्या चित्रात विनायक वीणा वाजवत असून नटेशाच्या डाव्या बाजूला गजमुख, चोळीधारण केलेली, मृदुंग वाजवणारी आणि कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेली वैनायकी चित्रित केलेली आहे. एशियाटीक सोसायटी, कोलकाता येथे “गणपतीहृदया” देवतेचे अत्यंत सुंदर लघुचित्र आहे. हे लघुचित्र वज्रयान पंथाच्या धारणी-संग्रह ह्या ग्रंथात आहे. चित्रातील देवता पांढऱ्या रंगात रंगवलेली असून पायाजवळ निळ्या रंगात उंदीर आहे. ह्या चित्राजवळ नेवारी संवत ९६३ (सन १८४३) आणि सर्वात शेवटी “आर्य्यश्रीगणपतिहृदयनामधारणी समाप्त” लिहिले आहे.

वैनायकीची मूर्तीवैशिष्ट्ये

गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, ओडिसा, आसाम आणि तामिळनाडू येथे वैनायकीची काही शिल्प उत्खननात, तर काही शिल्प मंदिरात बघावयास मिळतात. उपलब्ध शिल्पांनुसार वैनायकी आसनस्थ, वाहनावर आरूढ, उभी किंवा क्वचित नृत्यावस्थेत असते. वैनायकी शिल्प दोन किंवा चार हातांची आहेत. तसेच हातामध्ये परशु, पास, कमळ, दंड, सर्प, दात, मोदकपात्र, जपमाळ इ. विविध आयुधे किंवा वस्तू धारण केलेल्या आहेत. तसेच त्या अभयमुद्रा (संरक्षण) आणि वरदमुद्रेत (आशीर्वाद) असतात.

इतर राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वैनायकी शिल्प

मथुरा येथील शासकीय संग्रहालयात असलेली वैनायकीची मूर्ती भारतातील सगळ्यात जुनी मूर्ती असावी. ह्या मूर्तीचा काळ गुप्त राजवंशाच्या सुरुवातीचा आहे असे मानले जाते. ही मूर्ती द्विभुज असून डाव्या हातात कमळाचे फुल धरले आहे. लोहरी (उत्तरप्रदेश) येथील योगिनी संकुलातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. प्रतिहार काळातील (९वे शतक) ही मूर्ती असून ह्या मूर्तीच्या डाव्या हातात इंद्रासारखे वज्र आहे. तर उजव्या हातात लाडूऐवजी एखादे फळ धरले आहे. ह्या वैनायकीचे वाहनसुध्दा हत्ती आहे. त्यामुळे हि मूर्ती वैनायकीची असली तरी त्यात इंद्राणी (इंद्राची शक्ती) हिचे गुणधर्म दाखवले आहेत. रीखीआन (उत्तरप्रदेश) येथील वैनायकीला चार हात असून डोक्यावर मुकुट आहे आणि गळ्यात हार घातलेला आहे. ह्या मूर्तीला नेसवलेली साडी कंबरेभोवती खोचण्यात आलेली आहे. मध्यप्रदेशातील सुहानिआ येथे सापडलेली मूर्ती ग्वाल्हेर येथील पुरातत्व संग्रहालयात ठेवलेली आहे. वैनायकी त्रिभंग मुद्रेमध्ये असून आपले संपूर्ण वजन डाव्या पायावर घेतले आहे. ह्या मूर्तीच्या हातात कमळपुष्प, तलवार, परशू आणि लाडूंचा वाडगा हातात धरला आहे. ह्या मूर्तीच्या उजव्या पायाजवळ बासरीवादक आणि डाव्या पायाजवळ मृदुंगवादक आहे. सतना (मध्य प्रदेश) येथे उत्खननात सापडलेली आणि सध्या कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात असलेली दहाव्या शतकातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. सिंहारूढ वृषभा मातृकेच्या मांडीवर बालगणेश बसलेला आहे. सिंहाच्या पायाजवळ आसनस्थ चतुर्भुज वैनायकी आहे. हिच्या हातात कमळाचे फुल आणि दुसऱ्या हातात पुष्प आहे. उजव्या हातात गदेसारखे शस्त्र आणि डावा हात नष्ट झाला आहे. बहुदा या हात मोदकपात्र असावे. वृषभा मातृकेच्या खालील भागात श्री वसभा (श्री वृषभा) असे कोरलेले आहे.. चिदंबरम, तामिळनाडू येथे नटराजाचे मंदिर आहे. या मंदिरात असलेली वैनायकीची मूर्ती सोळाव्या शतकात विजयनगर राज्यकाळात तयार केली आहे. या मूर्तीचा कमरेच्या वरील भाग वैनायकीचा असून कमरेखालील भाग व्याल या काल्पनिक प्राण्याचा आहे. या वैनायकीची आजही तेथील स्थानिकांकडून पूजा केली जाते. व्याल आणि वैनायकी यांचे संयुक्त असे हे एकमेव शिल्पांकन आहे. याशिवाय चौसष्ट योगिनी मंदिरांमध्ये वैनायकीचे शिल्प बघायला मिळते.

भुलेश्वर मंदिरातील स्त्रीरूपी गणेश

पुणे – सोलापूर महामार्गावर यवतच्या आधी साधारणपणे १-२ किमीवर भुलेश्वरफाटा आहे. हा रस्ता थेट भुलेश्वर मंदिराजवळ जातो. दूरसंचार विभागाचा मनोरा हि भुलेश्वरची ओळख. हा संपूर्ण परिसर दौलतमंगळ किल्ला किंवा भुलेश्वर मंदिर या नावाने ओळखला जातो. मंदिराच्या  प्रदक्षिणामार्गावर थोड्या उंचीवर दोन वैनायकी मूर्ती आहेत. परंतु येथील वैनायकी इतर मातृकांबरोबर आहेत. हे दोन्ही मातृकापट आहेत. पहिल्या मातृकापटात वैनायकी, माहेश्वरी आणि ब्राम्ही या तीन मातृका आहेत. या शिल्पपटात वैनायकी माहेश्वरीच्या उजव्या हाताला तर ब्राम्ही डाव्या हाताला आहे. दुसऱ्या शिल्पपटात वैनायकी, वैष्णवी आणि कौमारी या मातृकांबरोबर आहे. दोन्ही वैनायकी सालंकृत (पायात वळे, हातात कंकणे, गळ्यात वक्षभूषण व कंठभूषण दागिने) आणि पद्मासनात बसलेल्या आहेत. एका वैनायकीने हातात अंकुश, पाश(?), दात आणि लाडूपात्र धारण केले. दुसऱ्या वैनायकी शिल्पाचा डावा हात नष्ट झालेला आहे. पण ह्या हातात लाडूपात्र असावे आणि इतर आयुधे आधीच्या वैनायकीप्रमाणे धारण केली आहेत. ­

मंदिराच्या गाभार्‍याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्रनामांत या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्‍न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.

महाराष्ट्रात मंदिर संस्कृतीच्या विविध अशा शिल्प शृंखला ज्ञात-अज्ञात अशा स्वरुपात आढळतात. प्राचीन काळापासूनच आपल्या प्राचीन, अर्वाचीन अशा संस्कृतीची साक्ष या शिल्पांमधून आपल्याला पाहायला मिळते. विविध ठिकाणी आढळणा-या या शिल्पांमधून इतिहासकालीन संस्कृती, देवदेवता यांचं दर्शन आपल्याला घडतं. काही ठिकाणच्या शिल्पाकृतींमध्ये श्री गणेशाच्या अतिसुंदर देखण्या अशा विविध रूपांतील मूर्ती तसंच भित्तीचित्रं आढळून आली आहेत. त्यातली काही अतिशय दुर्मीळ भित्तीचित्रं आणि शिल्पं आपल्याला आजही पाहायला मिळतात. त्यापैकीच एक  गणपतीचं दुर्मीळ शिल्प भुलेश्वरच्या या मंदिरात पाहायला मिळतं. हे शिल्प स्त्रीरूपातील गणपतीचं आहे.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर मारुतीचं दर्शन करून दगडी जिना चढून गेल्यावर डाव्या बाजूला एका खांबावर एक गणपती दिसतो. ही मूर्ती डाव्या पायावर उभी असून उजव्या पायाचा पंजा डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवलेला आहे. दोन्ही हातांनी उजव्या पायाचा गुडघा धरला आहे. हा एक योगासनातील प्रकार आहे. योगासनांमुळे शक्ती मिळते म्हणून याला शक्ती गणपती म्हणतात. भुलेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर पडत असताना प्रदक्षिणा मार्गावर कमानीजवळ एका खांबावर एक गणपती छताला पाठ लावून उभा आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की, या संपूर्ण मंदिराचा भार जणू या गणपतीने आपल्या खांबावर पेलला आहे.

प्रदक्षिणा मार्गावर मागील बाजूस भिंतीवर एक गणपती पाहायला मिळतो. स्त्रीरूपातील हा गणपती पद्मासनात बसलेला आहे. खालील बाजूस मूषकही बसलेला आहे. चतुर्भुज अशी ही मूर्ती आहे. त्यामुळे अनेकांना हे शिल्प पाहून अचंबा वाटतो. इथल्या तीन सप्तमातृकांच्या समूहात, या स्त्रीरूपी गणेशाचं दुर्मिळ दर्शन होते. औरंगाबाद येथील वेरुळच्या कैलास लेण्यात व सातारा येथील शिविलग समूहातील पाटेश्वरच्या डोंगरातही या प्रकारचं शिल्प आढळतं. प्राचीन वाङ्मयात आणि स्कंदपुरणाच्या काशीखंडात चौसष्ठ योगिनींच्या यादीत या गणेशाचा वैनायकी असा उल्लेख आढळतो. देवी सहस्त्रनामात या गणेशाला विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी अशा वेगवेगळ्या विशेषणांनी संबोधलं आहे. शिल्परत्न या ग्रंथात शक्तीगान्पती असा त्याचा उल्लेख केला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचं महत्व वाढलं. वैनायकी शिल्पं गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधं धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पं पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. मूर्तीखाली मूषक हे वाहनही पाहायला मिळत. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टीका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत. सध्या भुलेश्वर मंदिरात जी शिल्पं आहेत, ती काहीशी भग्न झालेली आहेत. काही समाजकंटकांकडून या सुंदर शिल्प समूहाची तोडमोड झाल्याचं अलिकडे लक्षात येतंय. काही प्रमाणात येथील प्रशासन व भौगोलिक परिस्थितीमुळे हे मंदिर अजाणतेपणे नजरेआड  होत होते. मात्र या मौल्यवान शिल्प खजिन्याच्या रक्षणाकरिता पुरातत्व विभाग आता पुढे सरसावला असून येथील धार्मिक, आध्यात्मिक परंपरेची जोपासना गुरव समजाकडून उत्तम केली जाते. त्यामुळे हे मंदिर केवळ भक्त भाविकांचे ठिकाण नाही तर मंदिर अभ्यासक, पर्यटकांचेही आकर्षण केंद्र बनले आहे. या शिल्प संस्कृतीच्या अभ्यासाकरिता विविध राज्यांतून मूर्ती अभ्यासक, पर्यटक येत असतात, तर धार्मिक अनुष्ठानाकरिताही अनेकजण येत असतात. पुरातत्त्व खात्याने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे.

पाटेश्वर मंदिरात असलेली वैनायकी
साताऱ्यापासून साधारणपणे ११ किमीवर देगाव येथे पाटेश्वर हा हिंदू लेणीसमूह आहे. येथील पाटेश्वर मंदिरात वैनायकी मूर्ती आहे. मूर्ती रेखीव, चतुर्भुज आणि शिलाखंडावर सुखासनात बसलेली आहे. मूर्तीच्या हातात परशु, पाश(?), सुळा आणि लाडूपात्र आहे. सोंडेचे टोक वळसा घालून लाडूंना टेकलेले आहे. मूर्तीच्या अंगावर वक्षभूषण, कंठभूषण, कमरपट्टा, कंकणे आणि वळे हे अलंकार असून त्यांच्यावर विशेष अशी कलाकुसूर नाही आहे. मस्तकावर असलेल्या किरीटमुकुटाभोवती प्रभावळ आहे. डाव्या पायाची आडवी मांडी घातलेली असून आहे आणि उजवा पायाचा गुडघा किंचित वर उचललेला असून पाय खाली टेकलेला आहे. पायाजवळ मूषक वाहन कोरलेले आहे.

 अंबाजोगाई वैनायकी

आंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिराच्या शिखरावरील कोनाड्यात वैनायकीची मूर्ती आहे. वैनायकीला सोळा हात असून मोदक, जपमाळ, तलवार, गदा आणि इतर आयुधे धारण केली आहेत. वैनायकीचा उजवा हात अभयमुद्रेत आहे. सोंडेचे टोक डाव्या हातातील लाडूला स्पर्श करते आहे. मोरपिशी रंगाची साडी नेसलेली वैनायकी पद्मासनात बसलेली आहे. प्रत्येक हातात कंकण आणि डोक्यावर मुकुट याशिवाय इतर कोणतेही अलंकार दिसून येत नाहीत

वैनायकी.... गणेशाचा स्त्री अवतार म्हणजे वैनायकी, की वैनायकी ही स्वतंत्र देवता आहे हा वाद पुराणा पासुनच सुरु आहे. वैनायकी ही गणेशासारखीच दिसते, मात्र ती स्त्री वेषभुषेत आहे म्हणून तिला गणेशाचा स्त्री अवतार म्हणून संबोधतात. पण वैनायकी ही देवता नेमकी कोण आहे आणि तिचा अंबाजोगाईशी काय संदर्भ आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करु.
श्री गणेशाच्या स्त्री अवतारासच वैनायकी म्हणून संबोधतात. सुख-समृध्दी देणारी आणि मंगलकरणारी स्त्री वेषातील गणेश देवता असणाऱ्या वैनायकी बध्दल तशी खुप कमी लोकांना माहिती आहे. पुराणकाळातील अनेक ग्रंथांमध्ये श्री गणेशाच्या या स्त्रीरुपी वर्णनाची माहिती दिली आहे. गणेशाच्या या स्त्रीरुपी अवतारास अनेकजण गणेशानी, गजनीनी, गणेश्वरी, गजमुखी, वैनायकी आणि इतर अनेक नावाने ओळखतात. भारतातील तामिळनाडू, मदुराई या भागात अनेक ठिकाणी श्री गणेशाची वैनायकी या स्त्रीरुपात पुजा केली जाते.
"मत्सपुराण" आणि "विष्णु धर्मोत्तर पुराण" या अतिप्राचीन धर्मग्रंथात या संदर्भात एक दंतकथा सांगण्यात आली आहे. त्याकाळी आंदोक नावाच्या राक्षसाने देवी पार्वतीच्या अपहरणाचा कट रचून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा आंदोक राक्षसाचा हा डाव उलटून लावण्यासाठी भगवान शंकराने आंदोक राक्षसाचा वध करण्यासाठी वार केलेल्या त्रिशुलाने माता पार्वती जखमी झाल्या. या जखमेतुन माता पार्वतीच्या शरीरातून निघालेले रक्त जमिनीवर पडले व ते दोन भागात विभागल्या गेले. ते दोन विभाग म्हणजे एक स्त्री चा आणि दुसरा पुरुषाचा अंश. या दोन्ही अंशातुन वैनायकी ची निर्मिती झाली असे सांगितले जाते.
अनेक लोक गणेशानी अथवा वैनायकी हीस गणेशाची पत्नी मानतात, मात्र हे सत्य नसल्याचे अनेक धर्मग्रंथात सांगण्यात आले आहे. वैनायकी ही एक स्वतंत्र देवी आहे. ती ६४ योगियां पासून निर्माण झालेला गणेशाचा स्त्री अवतार आहे. असे ही सांगितल्या जाते. काशी आणि उडिसा मध्ये अनेक ठिकाणी गणेशाच्या या स्त्री अवतारातील वैनायकी ची पुजा करण्यात येते. या वैनायकी च्या हातात युध्दात वापरण्यात येणारा परशु आणि कु-हाडी कायम असल्याचे दिसते.
१६ व्या शतकात सर्वप्रथम गणेशाच्या या वैनायकी अवताराची लोकांना माहिती झाली आणि तेंव्हापासूनच या वैनायकी देवतेची पुजा ही सुरु झाली. वैनायकी देवीचे अर्धे शरीर स्त्री चे आणि अर्धे शरीर हे हात्तीचे (म्हणजेच गणेशाचे) आहे. श्री गणेशाच्या मुर्ती प्रमाणेच वैनायकीची ही मुर्ती बसलेली, उभा टाकलेली आणि अनेकवेळा नृत्य करीत असलेली आढळून येते. वैनायकी ही एक स्वतंत्र देवता आहे. तिचा श्री गणेशाशी काहीही संबंध नाही. फक्त तिचे रुप गणेशाप्रमाणे आहे. असे मानणारा ही एक वर्ग आहे.
या वैनायकी देवीचे अंबाजोगाई आणि पाटण येथे मंदीरे असल्याची चर्चा आहे. मात्र अंबाजोगाई येथे वैनायकीचे स्वतंत्र मंदीर नाही. एवढेच नव्हे तर वैनायकी चे मंदिर अंबाजोगाईत असल्याचा कसलाही उल्लेख वा संदर्भ कोणत्याही धार्मिक ग्रंथात अथवा अलिकडील पुस्तकात आढळून येत नाही. मात्र साडेबाराशे वर्षांपुर्वी बांधण्यात आलेल्या अंबाजोगाईची ग्रामदेवता योगेश्वरी मातेच्या पाच मजली शिखराच्या दुसऱ्या मजल्यावरील देवतांच्या रांगेत वैनायकी देवतेची मुर्ती असल्याचे आजही स्पष्टपणे पहावयास मिळते.
योगेश्वरी माता मंदीराचे संपुर्ण बांधकाम हे हेमाडपंथी पध्दतीचे आहे. या मंदीराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे आहे की, या मंदीराच्या कळसाचे बांधकाम हे इतर मंदीरापेक्षा वेगळे आहे. या पाच मजली शिखराची ऊंची ७० फुट आहे. शिखराच्या पहिल्या मजल्यावर चारही बाजूंनी रामायण महाभारतातील निवडक प्रसंग असून दुसऱ्या मजल्यावर ६४ योगीयां पैकी कांही योगीयांच्या मुर्ती कोरण्यात आल्या आहेत. याच रांगेत वैनायकी देवतेची मुर्ती आणि श्री योगेश्वरी देवीचे व्दादश आवतार कोरलेले आहेत. सदरील वैनायकी ची मुर्ती ही अत्यंत सालांकृत असून सोळा भुजांची आहे. तिच्या हातात गड, धनुष्य, परशु, कु-हाडी, नाग, फुल, मोदक, अक्षमाला आदि साहित्य आहे. तर तिच्या दोन्ही बाजूस सिध्दहस्त पुरुष उभा टाकलेले आहेत. तर तिसऱ्या मजल्यावरही व्दादश अवतार, चौथ्या मजल्यावर नवग्रह तर पाचव्या मजल्यावर सप्तऋषी विराजमान झालेले आहेत.
सुख-समृध्दी देणारी आणि मंगल करणारी म्हणून ओळख असलेल्या या वैनायकी देवतेचा आणि अंबाजोगाईचा एवढाच संदर्भ आहे. म्हणूनच योगेश्वरी मातेचे दर्शन घेण्यापुर्वी या मंदीराच्या कळसाचे दर्शन घेण्याचा प्रघात अंबाजोगाई शहरात पुराणकाळापासून सुरु आहे.

 

 

 

 

Tags :