भुशुंडी ऋषी

" भुशुंडी ऋषी ". . . सदर मूर्ती ही गणपतीची नसून गणपती सोबत स्वरूपाने व रूपाने एकरूप झालेल्या भुशुंडी ऋषीची आहे . ऋषींची भावमुद्रा सौम्य आहे , तर हातात जप माळ आहे . भुशुंडी ऋषीची कथा गणेशपूरणातील उपासना खंडातील आहे. ही कथा थोडक्यात अशी की... दंडकारण्यात एक धीवर नावाचा कोळी राहत होता , त्याच्या दुष्ट व चोरट्या स्वभावामुळे त्याला नगरातून हद्दपार केले होते . त्यामुळे शिकार करून तो आपली उपजीविका चालवत होता . एकदा शिकार न मिळाल्याने दमून त्याने एका सरोवरात स्नान केले ( ते गणेश तीर्थ होते ) . व माघारी वळला . समोरून मुद्गल ऋषी येत होते . मुद्गल ऋषींना मारून काही तरी मिळेल या आशेने त्या धीवराने ऋषी वर खड्ग उचलला . परंतु ऋषीची सौम्य , शांत व तेजस्वी मुद्रा पाहून धीवराच्या हातातील खड्ग पडला , व तो ऋषीला शरण गेला . मुद्गल ऋषींनी त्याला " गणेशाय नमः " या षड्क्षरी मंत्राचा उपदेश करून अनुग्रह दिला. गुरू वचनावर विश्वास ठेवून तो कोळी गणेश नावाचा जप करत तेथेच बसला . शेकडो वर्षे हे चालले , तो पर्यंत त्याच्या अवती भोवती वारुळ तयार झाले . व त्या वरुळातून मंद मंत्र ऐकू येत होते .कालांतराने मुद्गल ऋषी त्या अरण्यातून जात असतांना त्यांना धीवराची आठवण आली व मुद्गल ऋषींनी त्याचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना वरुळातून गणेश मंत्राचा ध्वनी ऐकू आला . ऋषींनी ते वारुळ दूर केले व धीवराची अवस्था पाहून आश्चर्य चकित झाले . कारण हजार वर्ष तप करून धीवर गणेशाशी एकरूप झाला होता. त्याच्या भुवयामधून सोंड उत्पन्न झाली होती . मुद्गल ऋषींनी धीवराला तपातून उठवले व भुशुंडी ( भुवई मध्ये शुंड ,सोंड असलेला ) असे नाव दिले. भक्त हा भक्तीने त्याच्या उपास्य देवतेशी एकरूप होतो याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे भुशुंडी ऋषी. सदर मूर्ती ही मोरगावच्या मोरेश्वर मंदिरातील आहे

Tags :