मशिदीत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

कोल्हापूर जिल्ह्यात चक्क मशिदीत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुरुंदवाडमधल्या मशिदीमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. धार्मिक एकात्मतेचे असं उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं. ५० वर्षांहून अधिक वर्षांची ही परंपरा आहे.

कुरुंदवाड हे शहर राष्ट्रीय एकात्मतेचे आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारं शहर आहे. अर्थात हे प्रेम एकतर्फी नाही तर मोहरममध्येही हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. या शहरात हिंदू मुस्लीम समाजाची संख्या जवळपास समान आहे.

सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी या संस्थानाचे राजे पटवर्धन यांनी हिंदू मुस्लीम ऐक्याची परंपरा सुरु केली. पुढे गणेश उत्सव सुरु झाल्यानंतर याला आणखी बळकटी मिळाली. मुख्य म्हणजे या शहरातील एक दोन नव्हे तर पाच मशिदीत गणेशाची प्रतिष्ठापना होते. विशेष म्हणजे अनेक वेळा गणेश उत्सव आणि ईद एकाच वेळी येते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात गणेशाची प्रतिष्ठापना होते आणि त्याच वेळी पीर पंजाचा जयघोषही सुरु असतो.

राज्यात अनेक वेळा जातीय दंगली उसळल्या, मात्र त्याचा शहरातील हिंदू मुस्लीम ऐक्यावर कधीच परिणाम झाला नाही. इतकेच काय गतवर्षी मिरज आणि इचलकरंजी या दहा पंधरा किलोमीटर अंतरावरील शहरात हिंदू मुस्लीम दंगलीचा आगडोंब उसळला. बंद, मोर्चे हाणामारी लाठीचार्ज झाले, मात्र त्या काळातही शहराने ऐक्याचे आदर्श निर्माण केला.

Tags :