पाककृती

खव्याचे मोदक :

साहित्य :-
 • खवा १ वाटी (खवा शक्यतो खाऊन बघून आणावा म्हणजे ताजेपणा कळतो.)
 • पिठीसाखर अर्धी वाटी,
 • मिल्क पावडर ३ टीस्पून,
 • वेलची,
 • जायफळपूड
 • केशर किंवा रंग.
कृती :-

खवा पुरणयंत्रातून काढावा किंवा किसून घ्यावा. पॅनमध्ये तूप सुटेपर्यंत मंद गॅसवर भाजावा. उतरवून त्यात साखर, मिल्क पावडर, वेलची, जायफळपूड, केशरी रंग किंवा केशर घालून चांगले एकत्र करावे. जरा सुकले की साच्याला तूप लावून छोटे छोटे गोळे त्यात भरावेत. जास्तीचे मिश्रण काढून, मोदक काढून हवेवर ठेवावे. २१ मोदक एका ताटात सजवून नैवेद्य दाखवून खायला द्यावेत.

उकडीचे मोदक :

साहित्य :-
 • तांदूळ पिठी २ वाट्या,
 • तेल १ टेबलस्पून,
 • मीठ,
 • मैदा १ टीस्पून,
 • नारळ चव ३ वाट्या,
 • वेलचीपूड,
 • गुळ दीड वाटी चिरून,
 • साखर १ टेबल टीस्पून
कृती :-

नारळात गुळ व साखर घालून सारण शिजवून घ्यावे. जरा चिकट असताना उतरवून वेलचीपूड घालावी. जाड तळाच्या पॅन मध्ये २ वाट्या पाणी, तेल घालून उकळी आली की चिमुटभर मीठ घालावे. तांदूळ पिठी व मैदा घालून ढवळावे. मंद आचेवर दोन वाफा येऊ द्याव्या. झाकण ठेवून खाली उतरवून घ्यावे. परातीत काढून गरम गरम मळून ठेवावे. लिंबा एवढा गोळा घेऊन हाताने दाबत (अंगठा मध्ये ठेवून) वाटीचा आकार करावा. मध्ये जाडसर व बाजूने पातळ अशा वाटीला दोन बोटांच्या आधाराने कळ्या पाडाव्या. त्यात सारण घालून मोदक सगळ्या बाजूने नीट बंद करावा. असे पाच सहा मोदक झाले की केळीचे पान किंवा मलमलच्या ओलसर कापडावर मोदक ठेवून उकडून घ्यावे. २१ मोदक उकडून तयार झाले की बाप्पाला नेवैद्य दाखवून साजूक तुपाची धार लावून खावेत.