आरती करण्याची संपूर्ण कृती

आरती करतांना कोणकोणत्या कृती करायच्या असतात, ते पुढे दिले आहे.

अ. आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.
१. शंख वाजवण्यास प्रारंभ करतांना मान वर करून, ऊर्ध्व दिशेकडे मनाची एकाग्रता साधावी.
२. शंख वाजवतांना डोळे मिटून, ऊध्र्व दिशेकडून येणार्‍या ईश्वराच्या मारक लहरींना आपण आवाहन करून त्यांना जागृत करत आहोत, असा भाव ठेवावा.
३. शंख वाजवतांना शक्यतो आधी श्वास पूर्णतः छातीत भरून घेऊन मग एका श्वासात वाजवावा.
४. शंखध्वनी करतांना तो लहानापासून मोठ्या ध्वनीकडे न्यावा आणि तिथेच सोडावा.

आ. शंखनाद झाल्यानंतर आरती म्हणायला प्रारंभ करावा.
१. भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे, या भावाने आरती म्हणावी.
२. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी.
३. आरती म्हणतांना शब्दोच्चार अध्यात्मशास्त्र-दृष्ट्या योग्य असावा.

आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवाव्यात.
१. प्राथमिक अवस्थेतील : ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात.
२. पुढच्या अवस्थेतील : टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा.

ऑ. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवावीत.
१. घंटा मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.
२. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.

इ. आरती म्हणत असतांना देवाला ओवाळावे.
१. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.
२. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञा चक्रापर्यंत ओवाळावी.

ई. घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणावी.
उ. यानंतर कर्पूरगौरं करुणावतारं हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
ऊ. कापूर-आरती ग्रहण करावी.

कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)
ए. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
ऐ. त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
ओ . यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.
औ. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.
अं. नंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।

अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. मी तुझी आरती / पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्रो अपराध घडतात. मी तुझा दास आहे, असे समजून मला क्षमा कर. आरती कशी करावी?

गणपतीची आरती

गणपतीची आरती ही महाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांच्या प्रारंभी म्हटली जाणारी आरती आहे.

रचनाकार - समर्थ रामदास स्वामी

सुखकर्ता दुखहर्ता ,वार्ता विघ्नांची,
नुरवी; पुरवी प्रेम , कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ , मुक्ताफळांची॥१॥
जय देव ,जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन, कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट , शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे , चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर , फणिवरबंधना |
सरळ सोंड ,वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा , वाट पाहे सदना|
संकटी पावावे , निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥